टाकळी हाजी फीडरवरील ग्राहकांना कडक इशारा ; नियमभंग केल्यास गुन्हा दाखल होणार

310
 समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील महावितरणच्या टाकळी हाजी फीडर अंतर्गत येणाऱ्या वीज ग्राहकांसाठी वीज वितरण विभागाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. संध्याकाळी ६ ते १० या वेळेत घरगुती वापरासाठी सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत सुरु ठेवायचा असेल तर या काळात कोणत्याही प्रकारच्या मोटारी (पंप) सिंगल फेज पंप वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
शाखा अभियंता यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, संबंधित वेळेत मोटर वापरल्यास किंवा अनधिकृत कनेक्शन आढळल्यास संबंधित ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येईल. या करीता फीडरवरील सर्व ग्राहकांची तपासणी केली जाणार असून, दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल.तसेच ग्राहकांनी केवळ अधिकृत कनेक्शनद्वारेच वीज वापर करावा, असे आवाहन ही  केले आहे. थकबाकीदारांनी आपले वीज बिल तात्काळ भरून विभागास सहकार्य करावे,अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे लागेल,असा इशाराही देण्यात आला आहे. वीज वितरण विभागाच्या या कडक भूमिकेमुळे नियमांचे पालन न करणाऱ्या ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *