पाण्याच्या प्रश्नावर अभियंत्यांची एकजूट ; जलसंकटावर उपाययोजनांसाठी पुढाकार

126

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – भारतात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या पाणी प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी अभियंत्यांची एकजूट होत असल्याचे सकारात्मक चित्र समोर आले आहे. पाण्याची उपलब्धता, वापर, वाटप, संवर्धन आणि वाढते प्रदूषण या सर्व बाबींवर व्यापक चर्चा व जनजागृतीची गरज अधोरेखित करण्यात आली.


१९६८ मध्ये स्थापन झालेली इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशन ही देशातील अग्रगण्य संस्था असून तिचे देशभरात ३९ केंद्रे कार्यरत आहेत. सुमारे १४ हजारांहून अधिक अभियंते या संस्थेशी जोडलेले आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात तीन दिवसीय परिषदेत पाणी विषयक तांत्रिक, प्रशासकीय आणि सामाजिक पैलूंवर सखोल चर्चा केली जाते.
महाराष्ट्रात मुंबई नंतर पुणे हे या संस्थेचे मोठे केंद्र मानले जाते. पुणे सेंटरच्या चेअरमन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे विभागाच्या मुख्य अभियंता वैशाली आवटे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांची भेट घेत जलक्षेत्रातील समस्या व दीर्घकालीन उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत आवटे यांनी जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी मोठ्या प्रमाणावर या संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. अभियंत्यांचे संघटन मजबूत झाल्यास भविष्यातील जलसंकटावर प्रभावी उपाय शोधणे आणि ते प्रत्यक्षात राबवणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या संस्थेचे जागतिक पातळीवरील अमेरिकन वॉटर वर्क्स असोसिएशन, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप आणि आंतरराष्ट्रीय जल संघटना यांसारख्या संस्थांशी संबंध असल्याची माहितीही त्यांनी दिली.
संस्थेचे सचिव डॉ. दयानंद पानसे यांनी संस्थेच्या कार्याची व्याप्ती, तांत्रिक माहितीचा लाभ आणि समाजहितासाठी होणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.
डॉ. हेमंत धुमाळ यांनी सकारात्मक भूमिका घेत जलसंपदा विभागाकडून जनजागृतीचे उपक्रम राबवले जातील आणि अभियंते सक्रिय सहभाग घेतील, असे आश्वासन दिले. पाणी प्रश्न अधिक जटिल होत असल्याने शासकीय, अशासकीय संस्था, शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राजेंद्र माहुलकर, व्ही. एन. शिंदे, ढोबळे, अवचट, चंदनशिवे, खजिनदार अनिल पाटील तसेच विविध अभियंते व शिरूर मधील पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी प्रकाश वायसे आवर्जून उपस्थित होते.बैठकीच्या शेवटी खजिनदार अनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.एकत्रित प्रयत्न आणि जागरूकतेतूनच भविष्यातील जलसंकटावर मात शक्य असा आशावाद या बैठकीत व्यक्त करण्यात आला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *