शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कौशल्य विकास केंद्राच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बेरोजगार मेळावा 2026 तसेच कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात आणि प्रतिसादात संपन्न झाला. हा मेळावा दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील एमआयडीसी कौशल्य विकास केंद्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून Whirlpool चे प्लांट हेड स्वप्नील मुळे, रांजणगाव MIDC कनिष्ठ अभियंता भूषण ठाणगे, Ampersand ग्रुपचे कमलेश नुथी, स्वरूप सर, साई सर, चैतन्य सर तसेच परिसरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.
या मेळाव्यास 18 ते 40 वयोगटातील युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये परिसरातील तसेच आसपासच्या गावांमधून मोठ्या संख्येने बेरोजगार युवकांनी सहभाग घेतला. रोजगाराच्या संधींच्या शोधात आलेल्या उमेदवारांनी विविध कंपन्यांच्या डेस्कला भेट देत मुलाखती दिल्या व आपली कौशल्ये सादर केली.
या भव्य रोजगार मेळाव्यात रांजणगाव व कारेगाव एमआयडीसी परिसरातील अनेक नामांकित कंपन्यांचा सहभाग होता. यामध्ये Flipkart, Bajaj Auto , Hundai, LG, Whirlpool, JABIL, AB Infotech, Maruti Suzuki,अशा नामांकित कंपन्यांसोबत एकूण २० कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तसेच विविध क्षेत्रांतील – आयटी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आदी उद्योगांनी उमेदवारांची थेट मुलाखत घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक युवकांना प्रत्यक्ष नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मेळाव्याच्या दरम्यान कौशल्य विकास मार्गदर्शन शिबिरही घेण्यात आले. या शिबिरामध्ये तज्ज्ञांनी युवकांना आधुनिक उद्योगांच्या गरजा, आवश्यक कौशल्ये, तसेच करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. यामुळे युवकांना योग्य दिशादर्शन मिळाले आणि त्यांच्या भविष्यासाठी आत्मविश्वास वाढला.
Ampersand ग्रुपचे प्रोजेक्ट हेड कमलेश नुथी यांनी मेळाव्याचे उद्दिष्ट आणि महत्व स्पष्ट करताना सांगितले की, “या मेळाव्याचा उद्देश तरुणांना कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योजकता वाढवणे आहे.” तर केंद्राचे संचालक संजय पारडे यांनी भविष्यातील रोजगार संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्यांबाबत माहिती दिली. एकूणच, एमआयडीसी कौशल्य विकास केंद्राच्या या उपक्रमामुळे परिसरातील बेरोजगार युवकांना मोठा दिलासा मिळाला असून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना योग्य कौशल्य विकासाचे मार्गदर्शनही मिळाले. हा मेळावा युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला.


