मेफेड्रोन विक्री प्रकरणात विधिसंघर्षित बालक ताब्यात ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

37

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले असून मेफेड्रोन (एम.डी.) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने दि.११ ला करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार,स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर उपविभागात गुन्हे नियंत्रण व अमली पदार्थविरोधी मोहीम राबवत असताना, शिरूर बायपास येथील बंद पडलेल्या “नाना स्पॉट” हॉटेल परिसरात एक बालक मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीची तत्काळ वरिष्ठांना कल्पना देण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या मदतीने सापळा रचण्यात आला.कारवाईदरम्यान संबंधित विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे १ लाख ३८ हजार ८०० रुपये किंमतीचा ६.९४ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम.डी.) हा अमली पदार्थ आढळून आला आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३२१/२६ नोंद करण्यात आला असून एनडीपीएस कायदा कलम ८(क), २१(ब) तसेच बीएनएस कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस करत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच पोलीस कर्मचारी शुभम चव्हाण, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर व नीरज पिसाळ यांनी ही यशस्वी कारवाई केली.पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *