समाजशील न्यूज नेटवर्क, पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुण्याच्या धनकवडी परिसरातील पुण्याई नगर जवळील रुबी बेकारी नजीक नागरिकांसाठी धोकादायक ठरत असलेल्या मोठ्या चेंबरची अखेर दुरुस्ती करण्यात आली असून यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय महिला सह संपर्क प्रमुख व ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती वर्षाताई नाईक यांनी या प्रश्नी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.त्यामुळे श्रीमती वर्षाताई नाईक यांचे अभिनंदन होत आहे. सदर चेंबर अनेक दिवसांपासून धोकादायक अवस्थेत होते. त्यामुळे पादचारी, दुचाकीस्वार तसेच लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.या चेंबर जवळूनच खोलवर ओढा देखील असल्याची माहिती श्रीमती नाईक यांनी दिली होती.


या गंभीर समस्येबाबत साप्ताहिक समाजशील व विविध दैनिकातून देखील सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती वर्षाताई नाईक यांनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लावून धरला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे आणि वृत्तपत्र व समाज माध्यमांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत चेंबरची दुरुस्ती पूर्ण केली.
पावसाळ्यापूर्वीच दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने पुण्याई नगर, धनकवडी परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून वर्षाताई नाईक यांचे अभिनंदन केले जात आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिसरातून कौतुक होत आहे.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळेत झालेली ही दुरुस्ती महत्त्वाची ठरली असून भविष्यात ही अशा समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

