समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूरचे माजी आमदार स्व.बाबुराव दोंडकर स्मारक समितीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार व सन्मान सोहळा रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडे दहा वाजता रांजणगाव गणपती येथील समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.शिरूर तालुक्यातील तांदळी येथील कार्यक्षम माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र पोपटराव गदादे यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तांदळी येथील दोन हजार क्षारपड जमीन सुधारणा व लागवडी खाली आणून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य केले.त्यांच्या याच कामाची पावती म्हणून व दाखल घेत बाबुराव दोंडकर स्मारक समितीच्या वतीने त्यांना जलव्यवस्थापन पुरस्कार जाहीर झाला आहे.
गेल्या २९ वर्षांपासून बाबुराव दोंडकर स्मारक समिती शिरूर तालुक्यात भूमी संवर्धन, कृषी, जलव्यवस्थापन, शिक्षण, गोसंवर्धन आदी विविध क्षेत्रांत सामाजिक उपक्रम राबवत आहे. समितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या तसेच समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा यावेळी विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रतापराव पवार (अध्यक्ष, सकाळ मीडिया समूह) उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मा. डॉ. प्रवीण दवडघाव (प्रांत कार्यवाह, पश्चिम महाराष्ट्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) लाभणार आहे.
यावेळी स्व. कांचन भाई शाह (काका) जलव्यवस्थापन पुरस्कार, स्व. बिंदू माधव जोशी (नाना) पर्यावरण पुरस्कार, स्व. मधुकर अण्णा टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार (पुरुष), स्व. संतोष बापू गांधी गो गौरव पुरस्कार, स्व. गणपतराव मुकुंद खेडकर पर्यावरण पुरस्कार तसेच कै. बबुताई बाबुराव दोंडकर कृषी गौरव पुरस्कार (महिला) अशा विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करून सामाजिक कार्याला प्रोत्साहन देण्याचा समितीचा उद्देश असून, या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष ॲड. धर्मेंद्र खांडरे, उपाध्यक्ष धनंजय गायकवाड व सचिव हेमंत ढमाले यांनी केले आहे.


