समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – पशुधन चोरीच्या घटनांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी कारवाई शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने केली आहे. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी दोन आरोपींना जेरबंद करून पशुधन चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत चोरीस गेलेल्या दोन म्हशी, दोन बैल आणि एक पिकअप वाहन असा सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
शिरूर तालुक्यातील सरडवाडी गावच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान दादाभाऊ मगर यांच्या शेतातील मोकळ्या जागेत बांधलेल्या दोन म्हशी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. सुमारे ८० हजार रुपये किमतीच्या या म्हशी चोरीला गेल्याने शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना संशयित आरोपी रामनाथ सलीम भोसले (वय ३१, रा. पाण्याची टाकी, शिरूर) याच्याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी शिरूर बाजारपेठ परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने पशुधन चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तपासादरम्यान शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एक पशुधन चोरीचा गुन्हा ही उघडकीस आला.
चोरी केलेल्या पशुधनाची जावेद बबन पठाण (वय ३७, रा. वाळकी, जि. अहिल्यानगर) याच्याकडे विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेल्या दोन म्हशी,दोन बैल आणि पिकअप वाहन असा ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार अक्षय कदम करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार सो, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाने ही कारवाई केली आहे.
Home पुणे पशुधन चोरट्यांचा शिरूर पोलिसांकडून पर्दाफाश – दोन आरोपी जेरबंद ; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; म्हशी-बैल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई

पशुधन चोरट्यांचा शिरूर पोलिसांकडून पर्दाफाश – दोन आरोपी जेरबंद ; ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत; म्हशी-बैल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस; डी.बी. पथकाची धडाकेबाज कारवाई
BySamajsheel NewsSeptember 3, 20260
