शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत.त्यांना ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. किमान लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडेल अशी वक्तव्ये त्यांनी करू नये. त्यांनी जनतेचे ऐकावे. खोटे बोलणाऱ्या कार्यकर्त्यांचे न ऐकता त्यांनी पराभव स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे बोलताना दिली.
कोपर्डी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील निर्भयाच्या कुटुंबातील विवाह सोहळ्याला – उपस्थित राहण्यासाठी रविवारी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. दरम्यान, टाकळी हाजीच्या सरपंच अरुणाताई घोडे आणि माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी त्यांचा गावच्या वतीने सन्मान केला. यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,कर्जत-जामखेडचे राम शिंदे,भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी मारकडवाडी येथे शरद पवार यांनी जनता काय म्हणतेय हेही जाणून घ्या, असे म्हटले आहे. याविषयी विचारले असता फडणवीस म्हणाले, शरद पवार यांनी जनतेचे ऐकावे. कार्यकर्त्यांचे आणि खोटं सांगणाऱ्या नेत्यांचे ऐकू नये. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जनतेचे मत व पराभव स्वीकारला पाहिजे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली ते असे वागत असतील; पण मनातून त्यांना माहिती आहे पराभव का झाला असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.