समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत व कवठे येमाई ग्रामदैवत श्री येमाई देवी शारदीय नवरात्र महोत्सव यंदा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अश्विन शु. १ रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ ते विजयादशमी दि. २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व भजन-कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
नवरात्रोत्सवानिमित्त दररोज सकाळी सप्तशती वाचन, गोंधळी आरती, महापूजा, तसेच सायंकाळी सप्तशती वाचन, आरती, पूजा, नैवेद्य व गोंधळ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.या कालावधीत विविध भजनी मंडळे, आराधी संगीत पार्टी तसेच धार्मिक संस्थांच्या सहभागातून भजन, देवीची गाणी, होमहवन व संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिरूर, कवठे येमाई, आंबेगाव, राजगुरुनगर, जुन्नर, अहिल्यानगर आदी परिसरातील भाविक व कलाकार या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
होमहवनासह विजयादशमीचा विशेष सोहळा
नवरात्रोत्सवात होमहवनाचा विशेष धार्मिक कार्यक्रम रात्री आयोजित करण्यात आला असून, विजयादशमीच्या दिवशी श्री येमाई माता महापूजा, देवीची गाणी आणि सीमोल्लंघनासाठी पालखी प्रस्थान होणार आहे. जुन्या येमाई माता मंदिरासमोर सीमोल्लंघन पालखीची प्रदक्षिणा करून मंदिरात प्रवेशाचा पारंपरिक सोहळा पार पडणार आहे.
मंदिर परिसरात विविध विकासकामे
श्री येमाई देवी संस्थान व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिर परिसरात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यामध्ये श्री महागणपती मंदिर, श्री पुंजाबा मंदिर, तुळशी वृंदावन, जाळी कंपाऊंड, महिला व पुरुष प्रसाधनगृह, भक्तिनिवास, दर्शनबारी व शेड, पडवी नूतनीकरण, दक्षिणमुखी मारुती मंदिर नूतनीकरण, मंदिर रंगकाम, पेव्हिंग ब्लॉक, पालखी कक्ष, कार्यालय, वृक्षलागवड, सभामंडप, स्टील ग्रील, फरशी व पत्राशेड आदी कामांचा समावेश आहे.मंदिर व परिसराच्या सुशोभीकरणासाठी झालेल्या या विविध कामांना भाविक व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले असून, श्री येमाई देवी संस्थानने सर्व सहकार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी कवठे येमाई व परिसरातील तसेच महाराष्ट्रातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री येमाई देवी संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

