समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डास जन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर कवठे येमाई गावठाणात अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. काल दि.३ ला सायंकाळी फॉगिंग मशिनद्वारे विविध भागांत औषध फवारणी करण्यात आली.या बाबत समाजशील डिजिटल मधून सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.त्या वृत्ताची दाखल घेण्यात आली आहे.कवठे येमाई गावात सध्या प्रचंड उकाडा आणि सायंकाळच्या वेळेत दोन ते तीन तास डासांचा वाढता उपद्रव यामुळे ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले आहेत. डासांची संख्या वाढत असल्याने डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती.ग्रामपंचायत कर्मचारी अजित शिंदे व अमोल पंचरास यांनी फॉगिंग मशिनच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय परिसर, वीर हनुमान मंदिर परिसर, मुख्य बाजारपेठ, तांबट आळी ते सोसायटी परिसर या भागांत औषध फवारणी केली.दरम्यान, फॉगिंगची सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सध्याचा डासांचा प्रचंड उपद्रव पाहता केवळ एक-दोन दिवसांची फवारणी पुरेशी नसून सातत्यपूर्ण व व्यापक डास प्रतिबंधक मोहीम राबविण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

डासांची उत्पत्तीस्थळे शोधून नष्ट करण्याची मागणी
गावातील साचलेले पाणी, नाले-गटारे, कचरा व इतर संभाव्य डास उत्पत्तीस्थळांची पाहणी करून त्यावरही तातडीने उपाययोजना कराव्यात. फॉगिंगसोबतच नियमित औषध फवारणी व स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.उशिराने का होईना, ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली दखल स्वागतार्ह असली तरी आता ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

