शिरूर विधानसभा मतदार संघात शेतीसाठीचा विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायं. ५ वा. या वेळेत करा – सहकारमंत्री ना.दिलीपराव वळसे पाटील यांचे महावितरणला लेखी पत्र

95
शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे​,कार्यकारी संपादक) – शिरूर विधानसभा मतदार संघात  शेतीसाठीचा विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायं. ५ वा. या वेळेत करा याबाबत राज्याचे सहकारमंत्री तथा या भागाचे आमदार ना.दिलीपराव वळसे पाटील यांनी महावितरण अभियंता केडगाव विभाग यांना लेखी पत्र दिले असून यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव यांनी ​सा.समाजशील शी बोलताना दिली.
शिरूर विधानसभा मतदार संघात महावितरण कंपनीने भारनियमन करताना वेळापत्रकात केलेला बदल शिरूरच्या पश्चिमेकडील मलठण,कवठे,सविंदणे,टाकली हाजी व बेट भागातील गावे या परिसरातील शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत त्रासदायक ठरत असल्याच्या प्रतिक्रीया शेतक-यांकडून येत आहेत. वेळापत्रकानुसार सध्या  विद्युत मोटारीसाठी असणारा थ्री-फेजचा पुरवठा रात्री देण्यात येत आहे. परिसरात कांदा लागवडीचे काम जोरात सुरू आहे, रात्री कांदा लागवड करता येत नाही. या परिसरात बिबटयाचा मोठया प्रमाणात वावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यापुर्व कालावधीत शेतक-यांवर बिबट्याचा हल्ला होवून अनेक लोक मृत्युमुखी पडल्याच्या घटना ताज्या आहेत. यास्तव विद्युत मोटारीसाठी असणारा थ्री फेजचा विद्युत पुरवठा रात्री ऐवजी  दिवसा देण्याबाबत शेतक-यांची आग्रही मागणी असल्याचे मंत्री वळसे पाटील यांनी महावितरणला दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.
राजेश सांडभोर – अध्यक्ष,कवठे- टाकळी हाजी जि.प.गट (रा.कॉ. अजितदादा गट)
   मध्यंतरी काही काळ महावितरणकडून शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा केला जात होता. त्यामुळे शेतीला दिवसा पाणी देणे या भागातील शेतकऱ्यांना सोईचे ठरत होते.पण पुन्हा एकदा हा शेतीचा थ्री फेज वीज पुरवठा दिवस-रात्र पाळीत करण्यात आला. या भागात उसाची व बागायती शेती,शेतकऱ्यांकडे पशुधन मोठे असल्याने महावितरणने दिवसा शेतीसाठी वीज कायमस्वरूपी उपलब्ध करून दिल्यास बागायती व चारा  पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना सोईस्कर ठरेल. याभागात  बिबट्यांचे प्रमाण खूप मोठे आहे.  शेतक-यांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शेतीसाठी देण्यात येणारा विद्युत पुरवठा सकाळी १० ते सायं. ५ वा. या वेळेत तात्काळ करण्यात यावा.व तशी माहिती शेतकऱ्यांपर्यंत तात्काळ पोहचविण्यात यावी. 
 सुमित जाधव – उपकार्यकारी अभियंता,महावितरण,शिरूर  
 – सहकार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील यांचे पत्र आमच्या विभागास मिळाले असून यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहेत. शिरूरचा बेट भाग,कवठे येमाई व पंचक्रोशीतील गावांना शेतीसाठी आगामी दोन दिवसातच दिवसा थ्रीफेज वीजपुरवठा कसा सुरु करता येईल याबाबत महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *