शिरूर, पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान पार पडणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. सध्या सर्वच पक्षांकडून उमेदवारी यादीची घोषणा करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 7 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे.
शिरुर-हवेलीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. शिरुर-हवेली मतदार संघात भाजपा कडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु महायुतीच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला शिरुर-हवेली मतदार संघात जागा देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस न्हावरे येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतल्या भाषणात अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो’ असा दम दिला होता. त्यामुळे अजित पवार हे अशोक पवार यांना पराभुत करण्यासाठी कोणता तुल्यबळ उमेदवार देणार याकडे शिरुर-हवेलीकरांच लक्ष लागलं होते.अशोक पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे शिरुर-हवेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार अशा वावड्या उठवल्या जात होत्या. परंतु या मतदार संघात माऊली कटके तसेच प्रदीप कंद हे दोघेही इच्छुक होते. त्यामुळे गेले अनेक दिवस उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. शेवटी माऊली कटके यांना उमेदवारी मिळाल्याने हा तिढा सुटला आहे.
अजित पवार गटाची दुसरी यादी
इस्लामपूर – डॉ निशिकांत पाटील
तासगाव-कवठे महांकाळ – संजयकाका पाटील
अणुशक्तीनगर – सना मलिक
वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी
वडगाव शेरी – सुनील टिंगरे
शिरुर- ज्ञानेश्वर कटके
लोहा – प्रताप चिखलीकर