समाजशील न्यूज नेटवर्क : मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांच्या प्रचारासाठी मुरबाड येथील संतोषी माता मंदिरासमोरील मैदानात भव्य सभा झाली. बदलापूरातील `त्या’ घटनेनंतर तेथील मतदारांनीही किसन कथोरेंना बदलल्याशिवाय पर्याय नसल्याने मुरबाड मतदारसंघात परिवर्तनाची भूमिका असून, आता परिवर्तन अटळ आहे, असे भाकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज मुरबाड मधील जाहीर सभेत केले. या वेळी गोटीराम पवार, कॉंग्रेसचे कर्नाटकातील आमदार इवान डिसोझा, ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आप्पा घुडे, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर, रश्मी निमसे, कल्याण तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख, प्रवक्ते महेश चौघुले, जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे, तालुकाध्यक्ष दीपक वाघचौडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार, आरपीआय (सेक्यूलर) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कविता वारे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत आहे. या धोरणामुळेच मुरबाड मतदारसंघातही एमआयडीसीतील अनेक उद्योग बाहेर गेले. तर रोजगारनिर्मिती न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली. मुरबाडमधील प्रश्न सोडविण्यात किसन कथोरे सपशेल अपयशी ठरले, अशी टीका करीत असतानाच जयंत पाटील यांनी आजच्या सभेच्या गर्दीने महाविकास आघाडीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे म्हटले. भाजपा हा संकटात आला असून, बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा देऊन महाराष्ट्राला १८ व्या शतकात नेले जात आहे. पण शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी हे सहन करणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यात ४८ ठिकाणी सभा घेतल्यानंतर राज्यातील जनतेने पक्षफुटीबद्दल भाजपाला शिक्षा करण्याचे ठरविले असल्याचे भाकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी घणाघाती भाषणात करत आमदार किसन कथोरे यांच्यावर अपयशी ठरल्याचा आरोप केला.