शिरूरच्या कवठे येमाई शिवारात बिबट्याची दोन पिल्ले आढळली; वन विभागाकडून सुरक्षित कार्यवाही

597

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्यातीच्या पश्चिम भागातील कवठे येमाई शिवारात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला असताना आज रविवारी दि. ०४ सकाळी काळूबाईनगर नजीक टावरे यांच्या शेतात ऊस तोडणीदरम्यान बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


ऊसतोड कामगारांच्या निदर्शनास पिल्ले येताच तात्काळ शिरूर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी ताबडतोब त्या ठिकाणी धाव घेत ही दोन्ही पिल्ले सुरक्षितपणे ताब्यात घेतली. दरम्यान, उसाच्या शेतातून बिबट्याची मादी डरकाळी फोडत असल्याचे ऊसतोड कामगारांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
बिबट्याची पिल्ले पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याबाबत शिरूर वन विभागाचे प्रभारी अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर बिबट्याची पिल्ले सायंकाळी त्याच ठिकाणी पुन्हा ठेवण्यात येणार आहेत, जेणेकरून जेमतेम १५ दिवसांची असलेली ही पिल्ले पुन्हा त्यांच्या आईकडे परत जातील.तसेच मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा बसविण्यात येणार आहे. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी त्या भागात फिरकू नये तसेच आवश्यक दक्षता घ्यावी असे आवाहनही वनपरिक्षेत्र अधिकारी गव्हाणे यांनी सा. समाजशील शी बोलताना केले आहे.
दरम्यान, संबंधित शेतातील ऊस तोड तात्पुरती थांबविण्यात आली आहे. काळूबाईनगर परिसरात बिबट्यांचा सातत्याने वावर वाढल्याने शेतकरी दिवसा देखील शेतात काम करण्यास घाबरत असल्याचे चित्र आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *