त्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात पहाटे मादी बिबट अडकली : दोन पिल्ले व बिबट माणिकडोहकडे रवाना 

374
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे जिल्ह्य़ातील शिरूर तालुक्यातीच्या पश्चिम भागातील कवठे येमाई शिवारात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढलेला असताना काल रविवारी दि. ०४ सकाळी काळूबाईनगर नजीक टावरे यांच्या शेतात ऊस तोडणीदरम्यान बिबट्याची दोन लहान पिल्ले आढळून आली होती  या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी बिबट्याची ती जेमतेम १५ दिवसांची पिल्ले ताब्यात घेत त्यांना सुरक्षित ठेवले होते. दरम्यान ज्या ऊस क्षेत्रात हि पिल्ले आढळली तेथे कालच तात्काळ वन विभागाने पिंजरा लावला होता व आज पहाटेच्या दरम्यान मादी बिबट त्यात अडकली.
 वन विभागाचे वनपाल नितीन म्हात्रे,वनरक्षक नारायण राठोड वन कर्मचारी हनुमंत कारकूड व ५ जणांची रेस्क्यू टीम रात्रभर त्याच परिसरात ठाण मांडून होती. सकाळ होताच त्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट मादी अडकल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी ताबडतोब बिबट व दोन पिल्ले मणिकडोह बिबट निवारा केंद्राकडे हलविल्याचे शिरूर वन परिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
ऊस पीक हे बिबट्यांचे खास व सुरक्षित निवारा क्षेत्र ठरत असून आता ऊस तोड हंगाम सुरु असल्याने बिबटे जागा बदलत आहेत. त्यातच नव्याने पिल्लांना जन्म दिलेली मादी बिबट त्याच जागेवर वास्तव्य करीत असते जो पर्यंत तिची पिल्ले पळण्या,बागडण्यायोग्य होत नाहीत.अशावेळी शेतकऱ्यांनी ताबडतोब वन विभागाशी संपर्क करावा तसेच शेतात काम करताना योग्य ती आवश्यक खबरदारी, दक्षता घ्यावी असे आवाहनही गव्हाणे यांनी सा. समाजशील शी बोलताना केले आहे. काळूबाईनगर परिसरात काल रात्री मादी बिबट अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला असून काल सापडलेली दोन बिबट पिल्ले आज पुन्हा त्यांच्या आई समवेत माणिकडोहकडे रवाना केल्याने समाधान व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *