आईच्या दशक्रिया विधीत मुलांकडून विधायक उपक्रम : १००० ज्ञानेश्वरी ग्रंथांचे उपस्थितांना वाटप : तर शाळा व मंदिरांस साडे अठरा हजारांची देणगी 

619
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – ममता,प्रेम,त्याग आणि जीवनाचा जी आधार असते ,जिस्वार्थपणे मुलांचे पालनपोषण करते,त्यांच्या भावना समजून घेते आणि कुठल्याही कठीण प्रसंगात त्यांच्या सोबत ठाम उभी राहते ती आई होय.आणि याच आईच्या दातृत्वातून थोडेफार उतराई व्हावे या शुद्ध हेतूने आज गुरुवार दि. १ जानेवारी २६ रोजी शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील वैकुंठ स्मशान भूमीत आयोजित मातोश्री कै.अंजनाबाई ज्ञानेश्वर भोर वय ९० यांच्या दशक्रिया विधीत त्यांची मुले व नातवांनी उपस्थितांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या १००० ग्रंथ भेट देत एक विधायक उपक्रम रावबत इतरांपुढे एक उत्तम आदर्श ठेवला आहे.
   स्व.अंजनाबाईंचा मुलगा जालिंदर,कानिफनाथ भोर,मुलगी चंद्रभागा काटकर,नातू शरद,सागर,शुभम भोर,अमोल,बाबाजी,सोमनाथ काटकर यांनी कवठे येमाई गावाचे जुने जाणते गावकारभारी राहिलेले कै. ज्ञानेश्वर भोर व स्व.अंजनाबाई यांच्या पवित्र स्मृतींची आठवण ठेवत व त्यांच्या स्मरणार्थ आज गावातील इतर ही विधायक उपक्रमांना भरीव मदत दिली आहे. कवठे गावच्या ज्या भागात भोर,काटकर कुटुंबीय वास्तव्यास आहेत तेथील गणेशनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस स्वागत कमान,मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी टाकी,शाळेस दोन कपाटे व ५ हजार रुपयांची रोख मदत दिली. जि.प. प्राथमिक केंद्रशाळा गावठाण कवठे येमाई  ५ हजार तर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कुल ला ही ५ हजार रुपये मदत दिली.तर घोडनदी किनारी असलेल्या ऐतिहासिक श्री फत्तेश्वर मंदिर,श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर,भैरवनाथ मंदिर व गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री येमाई देवी मंदिरांच्या जीर्णोद्धार कामी प्रत्येकी २ हजार १०० रुपयांची रोख मदत दिली. तर दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या श्री फत्तेश्वर नामयज्ञ सोहळ्यासाठी हे कुटुंब मागील २५ वर्षांपासून भरीव योगदान देत आहे.भोर,काटकर कुटुंबांनी राबविलेल्या या स्तुत्य,विधायक व आदर्शवत उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत भोर,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मिठूलाल बाफना,ग्रामपंचायत सदस्य रामदास इचके,धार्मिक,आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *