सेवानिवृत्त नायब तहसीलदार तांबे यांचे निधन

175

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्रीधर दशरथ तांबे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांनी सकाळी शेतातील कामे आटोपून घरी आराम करत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.  खेड, जुन्नर, आंबेगाव, दौंड, शिरूर या तालुक्यात त्यांनी तलाठी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर सर्कल इन्स्पेक्टर, सर्कल ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. 2014 साली भोर तालुक्यात असताना ते नायब तहसीलदार पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी आपल्या मूळ गावी गणेगाव खालसा ( ता. शिरूर) येथे आपल्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. शेतीत वेगवेगळे प्रयोग करत, आधुनिक पद्धतीने शेती करून एक प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. कोरोना काळात गावात कोविड सेंटर उभारण्यापासून, शाळांना मदत करत सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. आयपीएस अधिकारी असलेले पी एम आर डी ए चे पोलीस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल तांबे यांचे ते वडील होत, तर पुण्याच्या उपजिल्हाधिकारी अर्चना अमोल तांबे यांचे ते सासरे होत. अंत्यसंस्कार समयी महसूल तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह, मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds