पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर, श्रीगोंदे आणि पारनेर या भागातील ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ निवेदक, आणि ‘आर्ट ऑफ स्पीच’ संस्थेचे संचालक रावसाहेब अरुण चक्रे यांना मातोश्री कला, क्रीडा व शैक्षणिक प्रतिष्ठान, शिरूर यांच्यातर्फे ‘उत्कृष्ट निवेदक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान १३ जुलै रोजी शिरूर येथे पार पडलेल्या भव्य कार्यक्रमात करण्यात आला. पुरस्कार प्रदान सोहळ्यास प्रकाशशेठ धारिवाल (जागतिक कीर्तीचे उद्योजक), म्हाडा अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, माजी आमदार अशोक पवार, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार तसेच मातोश्री संस्थेचे अध्यक्ष अभिजित आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. रावसाहेब चक्रे हे गेली दोन दशके निवेदन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी शरद पवार, पद्मभूषण अण्णा हजारे अशा दिग्गज नेत्यांच्या सभा, समारंभ, उद्घाटन, पुरस्कार वितरण व सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजारो वेळा निवेदन केले आहे. त्यांच्या आवाजाची जादू, कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार केलेला आवाजातील बदल, प्रभावी शब्दयोजना, ऐतिहासिक व सामाजिक संदर्भ यामुळेच प्रेक्षक त्यांच्या निवेदनात रमून जातात. ते “भाषण म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर स्वतःची ओळख निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे” हे तत्व अंगीकारून या कलेची समाजासाठी उपयोगी मांडणी करत आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेले, कोणतीही विशेष पार्श्वभूमी नसलेले रावसाहेब चक्रे यांनी आपल्या मेहनतीने, सातत्याने, आदिवासी भागातील लग्न समारंभांपासून सुरुवात करत, थेट राज्याच्या व्यासपीठांपर्यंतचा प्रवास केला आहे. पुरस्कार स्वीकारताना बोलताना त्यांनी नम्रपणे सांगितले, “आज प्रथमच कुणीतरी माझ्या कामाची दखल घेतली, माझं मूल्यमापन केलं. हे समाधान अवर्णनीय आहे. मान-अपमान पचवत, ध्येयाशी बांधिलकी ठेवून चालत राहिलं, तर यश मिळतंच.”