NEWS
Search

ज्ञानगंगा शाळेत “मुख्याध्यापक सन्मान सोहळा ” उत्साहात साजरा

366

शिरूर, पुणे  (देवकीनंदनं शेटे, संपादक) : शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील ज्ञानगंगा विश्वविद्यालय शाळेत मुख्याध्यापक स्नेह मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या मेळाव्यास शिरूर व पारनेर तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण, आपुलकीचे नाते दृढ करणे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आले. मेळाव्यात शिक्षण क्षेत्रातील सद्यस्थिती, शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी आवश्यक उपाययोजना, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी गंगा एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. राजेराम घावटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “ शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे मुख्याध्यापक. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेचा सर्वांगीण विकास साधता येतो. बदलत्या काळानुसार शिक्षणपद्धतीत नावीन्य आणणे, मूल्याधिष्ठित शिक्षण देणे व विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” संस्थेच्या वतीने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

मेळाव्यात विविध शाळांतील मुख्याध्यापकांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनातील अडचणी व त्यावरील उपाय यावर मुक्त संवाद झाला. यावेळी संस्थेचे खजिनदार सुधीर शिंदे, संचालिका अमृता घावटे, शाळेचे प्राचार्य गौरव खुटाळ, कॉलेज समन्वयक व्हि. डी. शिंदे, एडमिन शिशिर जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापिका जयश्री खणसे यांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांनी आभार प्रदर्शन करून मेळाव्याची सांगता करण्यात आली.

हा स्नेह मेळावा मुख्याध्यापकांमधील आपुलकी, सहकार्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा ठरला. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता कॉलेजच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds