मुरबाड,ठाणे : शेतकऱ्याना दहा हजार देवुन सरकार पन्नास हजार काढुन घेईल; राष्ट्रवादीच्या मुरबाड निर्धार परिवर्तन सभेत छगन भुजबळ यांची सरकार वर घणाघाती टिका

858
         मुरबाड,ठाणे : आगामी निवडणुकीत यश मिळविण्यासाठी वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून दहा हजार रुपये जमा केले जातील, अन्, निवडणूक संपल्यावर ५० हजार रुपये शेतकऱ्यांकडून काढले जातील असे भाकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे करीत घणाघाती टीका केली. आगामी निवडणुकीत मोदी विरुद्ध संविधान अशीच लढाई होईल, असेही भुजबळ म्हणाले.
 राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्ताने मुरबाड येथे झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री भुजबळ बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, धनंजय मुंडे, गणेश नाईक, शशिकांत पवार, फौजिया खान, गोटीराम पवार, सुभाष पवार, प्रमोद हिंदूराव आदी उपस्थित होते. या सभेला नागरिकाचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
       गेल्या निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. सर्वसामान्यांचे अच्छे दिनाचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता निवडणूक जिंकण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाईल. आपण सर्वांनी सावध राहिले पाहिजे. संविधानाच्या मागे राहण्यासाठी आपण आगामी निवडणुकीत भाजप सरकारला धोबीपछाड द्यावा असे आवाहन भुजबळ यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारामुळे देशवासीयांचा भ्रमनिरास झाला आहे. वार्षिक दोन कोटी रोजगार देऊ असे आश्वासन देऊन तरुणांना स्वप्ने दाखविली गेली. मात्र सध्या तरुणपिढी भ्रमनिरास झाली असून हवालदील झाली आहे. अशा परिस्थितीत तरुणांना आपल्याला आधार द्यायला हवा असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुटप्पी भूमिका घेऊन जनतेचा अपमान केला असल्याचा आरोपही पवार यांनी केला. राज्यातील आदिवासी क्षेत्रात बिगर आदिवासी तरुणांना नोकऱ्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या तरुणांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आधार दिला जाईल. आगामी काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यांत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन पवार यांनी दिले.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. `अच्छे दिन’चे नाव काढल्यावर आता लोक हसतात. मोदींकडून चौकीदार असल्याचे म्हटले जाते. मात्र, सोलापूर येथील सभेवेळी पंतप्रधानांच्याच व्यासपीठावर घोटाळेबाज सहकार मंत्री सुभाष देशमुख बसलेले होते. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींकडून कोणती अपेक्षा ठेवणार, असा सवाल मुंडे यांनी केला.
नरेंद्र मोदींची स्थिती गझनी चित्रपटातील नटी सारखी झाल्याची टिका मुंडे यानी केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारेमाप आश्वासने दिली. आता त्यांना ती आठवतही नाहीत. गझनी चित्रपटातील नायक ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर माहिती लिहून ठेवतो, तशी स्थिती पंतप्रधान मोदींची झाली आहे. त्यांना आश्वासने आठवत नाहीत, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी मोदींच्या आवाजात मिमिक्री केली. मुरबाड तालुक्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. शहरातील गाळे भ्रष्टाचार, नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मुरबाड तालुक्यात निश्चित परिवर्तन होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केला.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड,ठाणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *