समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील मलठण च्या शिंदेवाडी शिवारात आज शनिवार दि.२४ ला पहाटे ३ च्या सुमारास शेतात दावणीला बांधलेल्या ३ गाभण शेळ्यांवर शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून यातील एक शेळी जागेवरच ठार झाली तर अन्य दोन शेळ्या देखील मरण्याच्या वाटेवर असल्याची माहिती शेतकरी महिला आदिका संजय चोरामले यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली. या घटने बाबत शिरूर वन विभागास माहिती देण्यात आली असून वन रक्षक नारायण राठोड यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.


या घटनेबाबत अधिक माहिती देताना अदिती चोरमले यांनी सांगितले कि,आज पहाटे ३ च्या सुमारास कुत्र्याच्या जोरदार भुंकण्याने जाग आली. मी व मुलाने तात्काळ शेळ्या बांधल्या होत्या त्या दावणीकडे धाव घेतली.तोपर्यंत एका गाभण शेळीवर जोरदार हल्ला करीत तिला ठार केले होते. त्या मृत शेळीस पाहत असताना च बिबट्याने पुन्हा फिरून येत दावणीला बांधलेल्या इतर २ गाभण शेळ्यांवर पुन्हा हल्ला करीत खुंट्या,दोरी सह दोन्ही शेळ्या नजीकच्या मका पिकात ओढत नेल्या दरम्यान आदिती यांचा १७ वर्षीय मुलगा कार्तिकने बॅटरीच्या उजेडात एका बाजूने शेळी ओढून धरत तर दुसऱ्या बाजूने बिबट्या त्यांना ओढत असताना शेळ्यांना शर्थीचे प्रयत्न करून बिबट्याच्या तावडीतून सोडविले.तोपर्यंत त्या दोन्ही शेळ्या गंभीर जखमी झाल्या होत्या. दरम्यान आरडाओरडा केल्याने बिबट्याने मका पिकातून धूम ठोकली.एक गाभण शेळी मृत व दोन मरणासन्न अवस्थेत असल्याने कुटुंबाचे सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान होणार असल्याचे अदिती यांनी सांगितले.
निळकंठ गव्हाणे – वन परिक्षेत्र अधिकारी,शिरूर
“शिंदेवाडी शिवारात एकाच वेळी ३ शेळयांवर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली असून घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.तसेच या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावण्याच्या सूचना ही करण्यात आल्या असून मृत झालेल्या शेळीची नुकसान भरपाई शासन नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला नक्कीच मिळेल. नागरिकांनी देखील आपापल्या जनावरांची,पाळीव पशूंची योग्य ती सुरक्षितता घ्यावी.”



