पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सी.टी. बोरा महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी ग्रामीण विभागातील पारंपरिक महाविद्यालय गटात ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार प्राप्त आहे. विद्यापीठाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. पुरस्कारामध्ये तीन लाख रुपये रोख, गौरवचिन्ह व प्रशस्तिपत्रकाचा समावेश आहे. संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव नंदकुमार निकम व प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते डॉ. सुनील भोईटे यांनी हा सन्मान स्वीकारला.
महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धती या क्षेत्रांत सातत्यपूर्ण कामगिरी केल्याची दखल विद्यापीठाने घेतली. प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून उद्योगांशी केलेले करार, कॅम्पस मुलाखती, तसेच संशोधन व स्टार्टअप उपक्रमांतील योगदान यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, कौशल्यविकास आणि सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमांमुळे महाविद्यालयाने ग्रामीण भागात शैक्षणिक गुणवत्ता उंचावली असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. धोंडीराम पवार, बागेश्री मंठाळकर, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. जोत्सना एकबोटे, सागर वैद्य, डॉ. विजय खरे, डॉ. प्रभाकर देसाई तसेच कुलसचिव चारुशीला गायके आदी उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. हा सन्मान ग्रामीण शिक्षणसंस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत प्राचार्य मोहिते यांनी व्यक्त केले.

Previous Postयुवा क्रांतीचा बुलंद आवाज जेष्ठ पत्रकार प्रा.सुभाष शेटे दैनिक संध्याच्या २०२६ आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित
Next Postपुण्यातील १२ वी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना अनिल रेळेकर,वर्षाताई नाईक व युवा क्रांती संघटनेकडून शुभेच्छा


