समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – मागील एका महिन्याच्या अंतरात शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या जुने फत्तेश्वर मंदिर परिसरात घोडनदी किनारी अडचणीच्या भागात असलेले चार १०० केव्हीचे विजेचे ट्रान्स्फार्मर चोरट्यांनी तोडून ,फोडून महावितरणचे मोठे नुकसान तर केलेच आहे पण उन्हाळ्याच्या तोंडावर शेती पंपाचा व घरगुती वीज पुरवठा बंद झाल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.एकतर बिबट्यांची मोठी दहशत,दिवसा ही घडणाऱ्या चोरीच्या घटना यामुळे जीव मुठीत धरून शेतवस्तीवर वास्तव्यास असणारा या भागातील बळीराजा,मागे चोरीस गेलेले दोन रोहित्र अद्याप बसलेले नसताना परवा रात्री त्याच परिसरात असणारे आणखी दोन रोहित्र चोरट्यांनी फोडत त्यातील ऑइल ओतून दिले तर त्यातील कॉपर कडून घेत पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात शेतीला पाणी देणेच बंद झाले असून घरगुती लाईट ही मागील दोन दिवसांपासून बंद झाल्याने परिसरातील शेतकर्यांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या घटने बाबत शिरूर पोलिसांना कळविण्यात आले असून याबाबत तात्काळ तक्रार देण्यात आल्याची माहिती स्थानिक वायरमन सोमनाथ चौरे यांनी दिली. तर चोरट्यांनी फोडलेले १०० केव्ही चे चार ट्रान्स्फार्मर कधी बसवणार ? याबाबत ,शिरूरचे उपकार्यकारी अभियंता शरद माने,टाकळीहाजी शाखा अभियंता नितीन मुरकुटे,केडगाव विभाग,बारामती परिमंडळ यांचेकडे यांचेकडे विचारणा केली असता याच भागात मागील काही महिन्यात चोरट्यांनी १२८ ट्रान्सफार्मर फोडून महावितरणचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याची माहिती मिळाली.तर या परिसरातील शेतकरी अंधारात राहू नयेत म्हणून घरगुती वीज वापरासाठी असलेला ट्रान्स्फार्मर उद्या सोमवार दि. १६ ला शक्य होईल तेवढ्या जलदगतीने बसविन्यात येत असून तेथील शेती पंपाचे रोहित्र ही शक्य होईल तेवढ्या लवकर बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
शिरूरच्या पश्चिमेकडील विविध भागात होत असलेल्या वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस पोलीस प्रशासनाने गावोगावी ग्रामसुरक्षा दल सक्रिय करावे..दलातील जवानांना बरोबर घेत पोलिसांनी रात्री ११ च्या पुढे योग्य त्या ठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केल्यास वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना नक्कीच आळा बसेल.असा विश्वास युवा क्रांती फाउंडेशन राष्ट्रीय किसान विकास मंच चे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुभाष शेटे यांनी व्यक्त केला आहे.

