शिरूर (देवकीनंदन शेटे, संपदाक) : शिरूर जिल्हा पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च दरम्यान भव्य”श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम हा उद्योगपती स्व.रसिकलाल धारिवाल नगरी रामलिंग रोड,शिरुर जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दिनांक २ मार्च २६ या कालावधीत दररोज दुपारी एक ते सायंकाळी ४ या वेळेत आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. धारिवाल फाउंडेशन चे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे. या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्यप्रसंग, शिवतत्त्वज्ञान, भक्तीमार्ग, तसेच जीवनातील सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथा भक्तांना ऐकण्यास मिळणार आहेत. सदर कार्यक्रमाचे आयोजन रामलिंग रोड, शिरूर ग्रामीण येथे करण्यात आले आहे. या पवित्र कथेसाठी शिरूर परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी सर्व शिवभक्तांना केले आहे.




