शिरूर,पुणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (शिवजयंती) दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी केली जाते. शिवनेरी किल्ल्यापासून ते राज्यभरातील गावागावांत आणि शहरांत हा उत्सव ‘शिवमय’ वातावरणात साजरा होतो. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी केंद्रातील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी गीतांद्वारे वातावरण भारावून टाकले. केंद्र संचालक संजय पारडे यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करून राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी सेंटरमधील सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण रानमाळे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख श्रीनिवास माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.




