NEWS
Search

खासदार डॉ. कोल्हे यांनी यंदा जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत आगळ्यावेगळ्या व विधायक पद्धतीने शिवजयंती केली साजरी

102

पुणे (देवकीनंदन शेटे, संपादक) : पुणे – शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यंदा जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना,  आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा पत्नींना मानाचा मुजरा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाला विधायक स्वरूप दिले.

‘माणुसकीची चळवळ’ या संस्थेच्या माध्यमातून ‘जिवाची मुंबई’ हा उपक्रम गेली काही वर्षे सातत्याने राबविला जातो. या उपक्रमाचा एक भाग म्हणून यंदा यवतमाळ, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील ३० आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या विधवा/एकल पत्नींनी शिवजयंतीनिमित्त ‘मी सावित्रीबाई फुले’ मालिकेच्या सेटवर भेटीची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा पूर्ण करीत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मालिकेच्या सहकलाकारांसमवेत जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

खरं तरं दरवर्षी शिवजयंती दिवशी सकाळी शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होणं हा खासदार डॉ. कोल्हे यांचा अनेक वर्षांपासून चा परिपाठ. मात्र यंदा शिवनेरीवरील त्यांच्या अनुपस्थितीची शिवप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली. अनेकांनी कॉल करुन याबाबत विचारणा केली होती. या संदर्भात  मिळालेल्या माहितीनुसार खासदार डॉ. कोल्हे यांनी यंदा जिजाऊ, सावित्री आणि अहिल्याबाईंच्या लेकींना मानाचा मुजरा करीत त्यांच्यासमवेत आगळ्यावेगळ्या व विधायक पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विधवा/एकल पत्नी एकट्याने आयुष्याची  लढाई लढत आहेत, आव्हानांना तोंड देत आहेत. ‘मी सावित्रीबाई फुले’ मालिकेच्या सेटवर सहकलाकारांसमवेत त्यांना मानाचा मुजरा करण्याची, त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची संधी मिळणं ही मोठी गोष्ट होती. शिवछत्रपतींनी घालून दिलेल्या आदर्शाचे पालनच म्हणता येईल आणि म्हणूनच यंदा शिवनेरीवर जाण्याऐवजी सावित्री, अहिल्याबाई आणि जिजाऊंच्या लेकींना मानाचा मुजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी या माता-भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून भरून पावलो अशी भावना खासदार डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds