कवठे येमाई येथे बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून २१ कोंबड्या व बदकाचा फडशा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान

387

कवठे येमाई येथे बिबट्याचा धुमाकूळ; गोठ्यात घुसून २१ कोंबड्या व बदकाचा फडशा, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई परिसरात बिबट्याच्या हालचालींनी पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. फाकटे रोडनजीक टावरे वस्ती येथील गट नंबर 44/1अ येथे शेतकरी अफजल इनामदार यांच्या शेतातील गोठ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अफजल इनामदार यांच्या गोठ्याभोवती सुमारे ७ फूट उंचीची जाळी बसविण्यात आली होती. मात्र, रात्रीच्या सुमारास बिबट्याने ही जाळी ओलांडून गोठ्यात प्रवेश केला. यावेळी गोठ्यात पाळलेल्या बदकासह २० ते २५ गावरान कोंबड्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. या घटनेत इनामदार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.सकाळी अफजल इनामदार यांच्या पत्नी आशाबी इनामदार व मुले गोठ्यावर गेल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. गोठ्यातील मृत कोंबड्या व बदकांचे अवशेष पाहून त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आशाबी इनामदार यांच्यासह स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाचे कर्मचारी हनुमंत कारकुड यांना देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच लवकरात लवकर पिंजरा लावण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.ग्रामीण भागात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सानू इनामदार व नागरिकांकडून होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *