समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर युवासेना (उ.बा.ठा) पुणे उपजिल्हाप्रमुख रेवणनाथ शांताराम गायकवाड यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.संबंधित आरोपीने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप गंभीर व निंदनीय असल्याचे सांगत त्याला कठोरात कठोर शिक्षा,अगदी फाशीची शिक्षा व्हावी,अशी मागणी त्यांनी केली.
याचवेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर एकट्यांवरच कारवाई होत असल्याबद्दल गायकवाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या प्रकरणात अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे फोटो समोर आले आहेत. मग फक्त चाकणकरांनाच लक्ष्य का केले जात आहे ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गायकवाड यांनी पुढे म्हटले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सुनील तटकरे,दिपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील, निलेश लंके, श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांचे फोटो या प्रकरणाशी संबंधित म्हणून समोर आले असतील, तर नैतिकतेच्या आधारावर सर्वांवर समान निकष लावले जावेत.“जर चाकणकरांचा राजीनामा घेतला गेला असेल, तर ज्या-ज्या लोकांचे आरोपीसोबत फोटो आहेत, त्या सर्वांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत व त्यांच्यावरही चौकशी व्हावी,” अशी मागणी गायकवाड यांनी केली. तसेच काही महिला पदाधिकारी वैयक्तिक स्वार्थातून पातळी सोडून टीका करत असल्याचा आरोप करत त्यांनी अशा प्रवृत्तींचा ही निषेध केला.दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून संबंधित आरोपीवर कडक कारवाई करण्याबरोबरच सर्व संबंधितांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Home पुणे खरात प्रकरणावर युवासेनेचा निषेध; “एकट्या चाकणकरांवर कारवाई का?” – रेवणनाथ गायकवाड यांचा सवाल

खरात प्रकरणावर युवासेनेचा निषेध; “एकट्या चाकणकरांवर कारवाई का?” – रेवणनाथ गायकवाड यांचा सवाल
BySamajsheel NewsMarch 23, 20260
