NEWS
Search

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पी आय पदी प्रमोद क्षीरसागर यांची नियुक्ती ; गुन्हेगारीविरोधात कडक कारवाईचे संकेत

104

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पदी प्रमोद क्षीरसागर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी काल मध्यरात्री १२ वाजता अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे ग्रामीण भागातील गुन्हेगारीविरोधी कारवाई अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पोलिस दलातील अनुभवी आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रमोद क्षीरसागर यांनी यापूर्वी शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हे उघडकीस करण्यात आलेले असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून पोलीस-जनता संबंध अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला होता.शिक्रापूर परिसरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यातही त्यांनी यश संपादन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी विविध गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करत गुन्हेगारीवर आळा घालण्याचा प्रभावी प्रयत्न केला होता. त्यामुळेच त्यांच्या या नवीन जबाबदारीकडे मोठ्या अपेक्षेने नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा ही अत्यंत महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणणे, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करणे आणि विशेष मोहिमा राबविणे या शाखेच्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदावर प्रमुख पोलिस अधिकारी म्हणून क्षीरसागर यांची नियुक्ती झाल्याने गुन्हेगारीविरोधातील लढ्याला अधिक बळ मिळणार आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर आणि परिणामकारक पावले उचलण्याचा निर्धार पोलिस निरीक्षक क्षीरसागर करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून करण्यात येत असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था राखण्यात सहभाग घ्यावा अशी अपेक्षा पोलिस दलाकडून देखील होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *