तीर्थक्षेत्र श्री यमाईदेवी मंदिर येथे भव्य यात्रोत्सव व हनुमान जयंती उत्सव ; विविध कार्यक्रमांची रेलचेल

115

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे :  (देवकीनंदन शेटे,संपादक) – महाराष्ट्रातील तमाम  भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेले शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावाचे ग्रामदैवत असलेल्या तीर्थक्षेत्र श्री येमाईदेवीची यात्रा व हनुमान जयंती उत्सव  गुरुवार दिनांक २ व ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली आहे. हा श्री येमाई देवीचा यात्रा उत्सव व गावठाणातील वीर हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या दोन दिवसीय यात्रोत्सव सोहळ्यानिमित्त गावात विविध धार्मिक, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यात्रेच्या निमित्ताने पारंपरिक बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींमध्ये प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ७१ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५१ हजार रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी २५ हजार रुपये अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच फायनल फेरीसाठी विशेष भव्य चषक देण्यात येणार असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे १५ हजार, ११ हजार व ७५०० रुपयांची अतिरिक्त बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार असून परिसरातील नामांकित मल्लांचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच गुरुवारी रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत मंदिरा जवळ संगीतरत्न स्व. दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशा मंडळाच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणखी वाढणार आहे.
याशिवाय दि. २ गुरुवारी गावठाणात आयोजित पालखी सोहळा हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या वेळी ढोल ताशा मंडळ जुन्नर यांचे आकर्षक ढोल-ताशा वादन भाविकांचे लक्ष वेधून घेणार आहे. तसेच श्री इवेंट अँड डेकोरेशन यांच्या वतीने पालखीची विनामूल्य सजावट करण्यात येणार असून सोहळ्याला अधिक भव्यता प्राप्त होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ, कवठे येमाई (ता. शिरूर, जि. पुणे) यांनी केले आहे.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *