समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (सा.समाजशील वृत्तसेवा) – शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोकळदरा (कवठे येमाई) येथील विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष शिक्षक आवडा बनन कांदळकर (वय ४५ वर्षे) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
कांदळकर सर हे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे व समर्पित अध्यापन पद्धतीमुळे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवले. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते. विद्यार्थ्यांप्रती असलेली त्यांची जिव्हाळ्याची भावना आणि शिक्षणावरील निष्ठा त्यामुळे ते पालकांमध्ये आदरणीय ठरले होते.त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात कायम जिवंत राहतील, यात शंका नाही.
कांदळकर सरांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,वडील व कुटुंबीय,सहकारी शिक्षक,विद्यार्थी व मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी कांदळकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

विद्यार्थीप्रिय शिक्षक आवडा बनन कांदळकर यांचे निधन ; शिक्षण क्षेत्रावर शोककळा
BySamajsheel NewsApril 1, 20260
