समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – खेड तालुक्यातील वडगाव पाटोळे येथे समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ३९ वा अखंड हरिनाम सप्ताह दि. २७ मार्च ते ३ एप्रिल दरम्यान अत्यंत उत्साहात आणि भक्तिरसात पार पडला. दहा दिवस चाललेल्या या आध्यात्मिक सोहळ्याची सांगता ‘चिंतन केसरी’ ह.भ.प. भरत महाराज थोरात यांच्या काल्याच्या प्रभावी कीर्तनाने झाली.
या सप्ताहात दररोज पहाटे काकड आरती, श्री ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री नामवंत कीर्तनकारांची कीर्तने असा भरगच्च कार्यक्रम राबविण्यात आला होता. कीर्तनानंतर भाविकांसाठी दररोज महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, महिला भाविक तसेच तरुण वर्गाने मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजभूषण, उद्योगरत्न आणि दानशूर व्यक्तिमत्व शेठ नानजीभाई ठक्कर (ठाणावाला) उपस्थित होते. काल्याच्या कीर्तनानंतर त्यांनी उपस्थित भाविकांना अध्यात्मिक मार्गदर्शन करताना “मन आणि बुद्धीवर ताबा मिळवण्यासाठी अध्यात्म अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन केले. आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत धर्म आणि शास्त्राचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगत “शस्त्रापेक्षा शास्त्र प्रभावी” असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले. तसेच समाजात दानशूरपणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येकाने मानवी कल्याणासाठी आपला वाटा उचलण्याचे आवाहन त्यांनी केले.
या संपूर्ण सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव वरुडे पाटील यांचे ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. त्यांच्या पुढाकारामुळे यावर्षीचा सप्ताह अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या सप्ताहामुळे वडगाव पाटोळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा सुंदर संदेश पसरला.