समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर येथील निर्माण प्लाझा परिसरात एका गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती होण्याची घटना आज घडली. कडक उन्हात महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर महिला रस्त्यातच बसली आणि काही वेळातच तिने गोंडस बाळाला जन्म दिला.नगरसेविका डॉ.सुनिता पोटे व उपस्थित महिलांकडून तत्परतेने या महिलेस योग्य ती मदत मिळाल्याने माणुसकीचे दर्शन पहावयास मिळाले.
त्या गरोदर महिलेची अवस्था व तिला होत असलेल्या वेदना पाहून परिसरातील महिलांनी तत्काळ धाव घेत साड्या व स्कार्फ च्या मदतीने रस्त्यावरच बसलेल्या त्या महिले भोवती सुरक्षित वातावरण तयार केले.या परिस्थितीची माहिती मिळताच नगरसेविका डॉ. सुनिता पोटे,नगरसेविका पूजा पोटावळे आणि पत्रकार सुदर्शन दरेकर घटनास्थळी पोहोचले. डॉ. पोटे यांनी आवश्यक वैद्यकीय मदत करून लगेचच नवजात बाळाला सुरक्षित केले.त्यानंतर आई व बाळाला मिरा नर्सिंग होम येथे हलविण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. या घटनेत नागरिक, महिलांबरोबर रिक्षाचालक व मेडिकल व्यावसायिकांनीही मदत करून माणुसकीचे मोठे दर्शन घडवले.

