समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : ( प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – वडिलांचे छत्र अवघ्या तीन महिन्यांपूर्वी हरपलेले असताना च एकुलता एक मुलगा हरिभाऊ प्रभू इचके (वय ४०) यांचे ही अकाली निधन झाल्याने इचके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्यामुळे त्यांच्या पत्नी व दोन शिक्षण घेणाऱ्या मुलांसमोर उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

हरिभाऊ इचके हे निष्णात पखवाज वादक होते. नुकतीच त्यांनी पंढरपूरची वारी पूर्ण करून घरी परतल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून इचके कुटुंबावर आभाळ कोसळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.पत्नी ललिता इचके यांच्यावर आता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली आहे. आधी आजी-आजोबांचे व आता घरातील एकमेव कर्त्या पुरुषाचे ही निधन झाल्याने या कुटुंबाला आधार देणारे कोणीही उरलेले नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू राहावा यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि सेवाभावी नागरिकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सोपानराव वागदरे, वर्गमित्र अनिलकुमार रायकर आणि फौजी मित्र दत्तात्रय इचके यांनी सा.समाजशील शी बोलताना केले आहे.
“थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करून या दुःखी कुटुंबाला नव्याने उभे राहण्यासाठी बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इच्छुक दात्यांनी खालील बँक खाते क्रमांक, IFSC कोड किंवा स्कॅनर (QR Code) च्या माध्यमातून किंवा 9881896843 या मोबाईल क्रमांकावर आर्थिक मदत पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६

