समाजशील न्यूज नेटवर्क धनकवडी,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – धनकवडी परिसरातील पुण्याई नगर, लेन क्रमांक ४ येथे मागील वर्षभरापासून तुंबलेल्या चेंबरमुळे नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छते चा सामना करावा लागत होता.ही बाब अखेर काही जाणकार नागरिकांनी वरिष्ठ समाजसेविका तथा युवा क्रांती पोलीस मित्र संघटनेच्या राष्ट्रीय महिला सह संपर्कप्रमुख श्रीमती वर्षाताई नाईक यांच्या निदर्शनास आणताच श्रीमती नाईक यांनी तातडीने या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्यामुळे या समस्येची दखल घेण्यात आली असून, परिसरातील तब्बल १४ चेंबर अवघ्या दोन तासांत स्वच्छ करण्यात आले.

पुण्याई नगर परिसरातील नागरिकांनी चेंबर तुंबल्यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी व अस्वच्छतेची समस्या वर्षाताई नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी तातडीने संपर्क साधला. त्याची दखल घेत संबंधित विभागाचे तावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सकाळीच धनकवडी येथील त्रिमूर्ती अपार्टमेंटकडे धाव घेत परिसराची पाहणी केली.यावेळी त्रिमूर्ती अपार्टमेंटच्या सोसायटी पदाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.हा प्रश्न सोसायटीने तात्काळ मार्गी न लावल्यास महापालिकेकडून मोठा दंड आकारण्यात येईल अशा सूचना वजा दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यानंतर सोसायटी पदाधिकारी आणि वर्षाताई नाईक यांनी संबंधित खाजगी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून चेंबर स्वच्छतेचे काम तातडीने सुरू केले.
केवळ दोन तासांच्या कालावधीत परिसरातील सुमारे १४ तुंबलेले चेंबर स्वच्छ करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या त्रासातून मोठा दिलासा मिळाला आहे. 
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या समस्येकडे तातडीने लक्ष वेधून ती मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल परिसरातील नागरिकांनी श्रीमती वर्षाताई नाईक यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

