समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील कवठे येमाई गावात डासांची उत्पत्ती वाढत असताना डेंग्यू व मलेरियासारख्या डासजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कवठे यमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आज सकाळपासून गावठाण परिसरात प्रतिबंधात्मक तपासणी, जनजागृती व दक्षता मोहीम सुरू करण्यात आली.आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधत डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या मोहिमेत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक विनायकराव गोसावी,आरोग्य सेवक अमोल जाधव,आशा वर्कर प्रगती कांदळकर,आशा वर्कर अर्चना उघडे यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने सहभाग घेतला. घराभोवती तसेच परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे, डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे आणि तापाची लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, गावात डासांची उत्पत्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डास प्रतिबंधक फवारणी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मागील जुलै महिन्यातच ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आल आहे, अशी माहिती आरोग्य सेवक विनायकराव गोसावी यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
मात्र, संबंधित निवेदनांनंतरही ग्रामपंचायतीकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने अनेक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. डासांची वाढती उत्पत्ती आणि डेंग्यू-मलेरियाचा संभाव्य धोका लक्षात घेता गावठाण परिसरात तातडीने डास प्रतिबंधक फवारणी करून स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.या बाबत ग्रामविकास अधिकारी पूनम थोरात चितळकर यांना थेट संपर्क साधला असता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शक्य होईल त्या डास प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करू असे आश्वासन दिले आहे.आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुढाकार घेतला असला तरी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६