NEWS
Search

कवठे येमाईत श्री गणेशाचे उत्साहात आगमन : मुलींच्या सुरेल भजनाने मिरवणुकीत रंगत; बारा दिवस धार्मिक, सामाजिक व करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल

62

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) –  गणरायाच्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथे श्री गणेशाचे उत्साहात आगमन झाले. गावातील पहिल्या मानाच्या श्री गुरुदेवदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या गणपतीची शेकडो कार्यकर्ते व भाविकांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून रात्री ७.५० वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी आळंदी येथील सुदाम हिंगे यांच्या राजमाता मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या सुरेल, स्वरबद्ध भजनांनी व गवळणींनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थिनींच्या भक्तिमय सादरीकरणाने गणेश आगमन मिरवणुकीत विशेष रंगत निर्माण झाली.श्री गणेश आगमनानिमित्त डीजे विरहित व शांततामय मिरवणूक काढत सामाजिक सलोखा व शांततेचा संदेश देण्यात आला. प्रतिष्ठापनेनंतर उपस्थित भाविकांसाठी मासवडीच्या पारंपरिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
यंदाच्या गणेशोत्सवात पुढील बारा दिवस विविध धार्मिक, सामाजिक, समाजोपयोगी व करमणुकीच्या कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मंडपाची आकर्षक सजावट व नेत्रदीपक रोषणाईने परिसर उजळून निघाला असून, आमदाबाद येथील राजू जाधव यांच्या सुंदर मंडप व्यवस्थेने गणेशोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली आहे.
गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी अक्षय भंडारी,अथर्व काळे,सागर जाधव,तेजस काळे,चिराग रावल,संकेत चव्हाण,रोहित जगदाळे,शुभम कुंभार,अतिकूर अन्सारी, ओंकार बांगर, मयूर रेणके, विकास जाधव यांच्यासह मंडळातील कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत. भक्ती, संस्कृती, सामाजिक बांधिलकी आणि उत्साह यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या गणेशोत्सवामुळे कवठे येमाई गावात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *