NEWS
Search

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती व उपाययोजना लागू ;  पुणे जिल्ह्यातील शिरूर सह ८ तालुक्यांचा समावेश 

8

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – खरीप हंगाम २०२६ मधील पावसाची तूट आणि अन्य घटकांमुळे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे कृषी आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय काढून या २६५ तालुक्यांमध्ये  दुष्काळी उपाययोजना व विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीनुसार खरीप २०२६ मधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६च्या अहवालानुसार २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाल्याचे शासन निर्णयात नमूद आहे.
शेतकऱ्यांना मिळणार विविध सवलती
दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांमध्ये शासनाने विशेष बाब म्हणून खालील उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जमीन महसुलात सूट,पीक कर्जाचे पुनर्गठन
शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती,कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सूट; ७.५ हॉर्सपॉवरपर्यंतच्या पंपांचे वीजबिल आधीच माफ करण्यात आले असून त्यावरील पंपांना ही सूट लागू राहील.शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी,रोजगार हमी योजने अंतर्गत कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे,आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा,टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे,शेतीवर अवलंबून शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची टंचाई भासू नये यासाठी व्यवस्था,जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे,जलसंधारणाची कामे सुरू करणे,पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे.
पंचनाम्यांची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश
Trigger-1 लागू झालेल्या सर्व २६५ तालुक्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनाम्याची कार्यवाही सुरू करावी, तसेच सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची स्थिती दर्शविणारे छायाचित्र आणि GPS कोऑर्डिनेट संकलित करून पीक परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाला तात्काळ सादर करावा, असे आदेश शासन निर्णयात देण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर असे ८ तालुके Trigger-1 अंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्याचाही या शासन निर्णयात स्पष्ट समावेश आहे.
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *