NEWS
Search

सानुग्रह अनुदान साठी नियमित कर्जदार शेतकऱ्यांची प्रतीक्षा : थकित कर्जदार तुपाशी, नियमित कर्ज फेडणारा शेतकरी उपाशी! सप्टेंबर संपत आला ; ५० हजारांच्या सानुग्रह अनुदानाचे पैसे कधी मिळणार?

13

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – कर्जाची परतफेड वेळेवर करून बँकिंग व्यवस्थेवरील आपली विश्वासार्हता जपणाऱ्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांची मात्र शासनाच्या सानुग्रह अनुदानासाठी प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे थकीत कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ मिळत असताना, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कधी जमा होणार? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित होत आहे.त्यामुळे थकीत कर्जदार तुपाशी, नियमित कर्ज फेडणारा शेतकरी उपाशीच म्हणण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे.
राज्य शासनाच्या २०२६ च्या कर्जमुक्ती योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
मात्र सप्टेंबर महिना संपत आला तरी अनेक पात्र नियमित कर्जदार शेतकरी अद्यापही या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ‘वेळेवर कर्ज फेडले, आता आमचा काय गुन्हा?’ असा सवाल शेतकरी करत आहेत.
शासनाने नियमित कर्जदारांचा सन्मान करण्याचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्ष लाभासाठी होत असलेली दिरंगाई शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. शासनाने पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सानुग्रह अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
थकबाकीदारांना दिलासा आणि नियमित कर्जदारांना प्रतीक्षा—हा अन्याय कधी संपणार? हा प्रश्न आता शासनाने स्पष्टपणे उत्तर देण्याची वेळ आली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *