समाजशील न्यूज नेटवर्क,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : सुरक्षित समाज, समृद्ध राष्ट्र या संकल्पनेतून पोलीस मित्र संघ (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने विविध सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. नोंदणीकृत NGO ट्रस्टच्या माध्यमातून समाजातील बेरोजगार, युवक, शेतकरी, पशुपालक तसेच उद्योजकांना विविध प्रकारचे मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संघटनेने सुरू केला असल्याची माहिती पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शाम घाडगे यांनी दिली.

संघटनेच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्यासाठी कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योग, कौशल्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जात आहे. तसेच DIC, जिल्हा परिषद आणि विविध शासकीय योजनांचा लाभ उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत केली जात आहे.विविध व्यवसायांसाठी NGO नोंदणीकृत उमेदवार उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण व सक्षम व्यक्तींची नियुक्ती करून रोजगाराच्या संधी निर्माण करणे,हा उपक्रमही राबविण्यात येत आहे.
ग्रामीण भागातील युवक व नागरिकांसाठी शेळीपालन, गायपालन,पशुपालन,शेती आणि विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आला आहे.महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शेळीपालन प्रकल्प विकसित करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा उद्देश आहे.यासोबतच LDPE व HDPE प्लास्टिक कचऱ्यापासून विटा तयार करण्याचे प्रकल्प जमिनीस्तरावर सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.या माध्यमातून पर्यावरण संरक्षण,प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच सौरऊर्जा व पवनऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जेवर आधारित विविध व्यावसायिक प्रकल्पांसाठी कमी दरात ऊर्जा निर्मिती करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही संघटनेने मांडला आहे.संघटनेच्या प्रमुख कार्यक्षेत्रात शेती व कृषी विकास, रोजगार निर्मिती, आरोग्य सेवा, शिक्षण व कौशल्य विकास, CSR व सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षण या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे.
“समाजासाठी सदैव तत्पर चला, मिळून घडवूया समृद्ध महाराष्ट्र!” या संदेशातून पोलीस मित्र संघाने सामाजिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले आहे.

