NEWS
Search

ज्येष्ठांच्या निरोगी आयुष्यासाठी धामारी त आरोग्याचा जागर; तपासणीसोबत दिला ‘दहा सूत्री मंत्र’

15

– हिमोग्लोबिन, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी; डॉ. भाऊसाहेब वाघमोडे यांचे ज्येष्ठांना आरोग्यविषयक मार्गदर्शन
समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) : आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून आयुष्मान आरोग्यवर्धिनी (आयुष) व उपकेंद्र, धामारी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. धामारी व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची हिमोग्लोबिन, रक्तदाब, मधुमेह तसेच आवश्यक प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढत्या वयात उद्भवणाऱ्या आजारांचे वेळीच निदान व्हावे आणि आवश्यक उपचार व मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
आयुष्मान आरोग्यवर्धिनी धामारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब वाघमोडे यांनी वयानुसार शरीरात होणारे बदल, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, हाडांची झीज, सांधेदुखी, दृष्टी-श्रवण समस्या आणि मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले.
गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष नको!
छातीत दुखणे, अचानक घाम येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चेहरा किंवा हात-पाय एका बाजूला कमजोर होणे अथवा बोलण्यात अचानक अडचण येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे डॉ. वाघमोडे यांनी सांगितले. रक्तदाब व रक्तातील साखरेची नियमित तपासणी करण्याबरोबरच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद किंवा बदलू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांनी कमी मीठ, कमी साखर व कमी तेल असलेला संतुलित आहार घ्यावा. आहारात फळे, भाज्या, कडधान्ये आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. आपल्या आरोग्यस्थितीनुसार पुरेसे पाणी प्यावे तसेच चहा-कॉफीचे अतिसेवन टाळावे, असा सल्ला देण्यात आला. झोपेच्या गोळ्या स्वतःहून घेऊ नयेत आणि चांगल्या झोपेसाठी रात्री मोबाईलचा अतिवापर टाळावा, असेही सांगण्यात आले.
ज्येष्ठांसाठी आरोग्याचा ‘दहा सूत्री मंत्र’
नियमित आरोग्य तपासणी, रक्तदाब-मधुमेह नियंत्रण, संतुलित आहार, पुरेसे पाणी, क्षमतेनुसार नियमित व्यायाम, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार, घरातील सुरक्षितता, डोळे-कान-दात व हाडांची काळजी, मानसिक आनंद आणि गंभीर लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय सल्ला — असा आरोग्याचा दहा सूत्री मंत्र ज्येष्ठांना देण्यात आला.
“वृद्धत्व हा आजार नाही; तो जीवनाचा एक सुंदर टप्पा आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, आवश्यक तपासण्या, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार आणि आनंदी मन यामुळे ज्येष्ठांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय व समाधानकारक होऊ शकते.”
— डॉ. भाऊसाहेब वाघमोडे
ज्येष्ठांनी पूर्णपणे निष्क्रिय न राहता आपल्या क्षमतेनुसार चालणे, हलका व्यायाम, स्ट्रेचिंग, संतुलनाचे व्यायाम, योग व प्राणायाम करावा. मानसिक आरोग्यासाठी कुटुंबीयांशी संवाद, सामाजिक सहभाग आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी सारिका राठोड, औषध निर्माण अधिकारी संदीप खैरे, योग प्रशिक्षक अंकुश घारे, आरोग्य सेवक निलेश शेंडे, आरोग्य सेविका आशा हिंगे, आशा सेविका तसेच माजी आरोग्य सहाय्यक शिवाजीराव पावशे यांनी सहकार्य केले.यावेळी सरपंच सीमाताई शेळके, माजी सरपंच संपतराव कापरे, माजी ग्रामपंचायत सदस्य माधवराव पठारकर, ज्येष्ठ नागरिक सतीशराव गायकवाड, माजी मुख्याध्यापक श्रीधर गायकवाड सर, तुकाराम शेळके यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.आरोग्य तपासणीसोबतच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारे मार्गदर्शन मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. योग प्रशिक्षक अंकुश घारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *