NEWS
Search

कवठे येमाईत दुष्काळी पंचनाम्यांचा वेग! दहा – दिवसांत ३०० शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळी निधी मिळवून देण्यासाठी महसूल प्रशासनाची तत्परता; – आवश्यक कागदपत्रांसह अर्ज तलाठी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

155

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई परिसरात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय दुष्काळी मदत मिळावी यासाठी महसूल प्रशासनाकडून पीक पंचनाम्यांच्या कामाला वेग देण्यात आला आहे. मागील दहा दिवसांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी व छायाचित्रे घेऊन सुमारे ३०० शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी अधिकाधिक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल यंत्रणा कार्यरत असून, नुकसान झालेल्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला शासनाच्या नियमानुसार मदत मिळावी, यासाठी पंचनाम्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.ग्राम महसूल अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी शलाका अशोक भालेराव यांच्याकडे कवठे येमाई, इचकेवाडी आणि गुंजाळवाडी या तीन गावांचा कार्यभार आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून पंचनामे व मदतीसंदर्भातील कामांसाठी तलाठी कार्यालयात दररोज गर्दी होत आहे.या कामी लव्हाजी सांडभोर, पोलिस पाटील गणेश पवार हे महत्त्वपूर्ण सहकार्य करीत आहेत. प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करणे, पिकांच्या नुकसानीची छायाचित्रे घेणे आणि पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करणे, यासाठी महसूल यंत्रणेकडून प्रयत्न सुरू आहेत.


शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत तसेच सर्वांनी पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी शलाका भालेराव यांनी केले आहे.
पावसाअभावी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत पूर्ण करून त्यांना नियमानुसार दुष्काळी मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *