समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे मार्जिन मनी अद्याप बँक खात्यांमध्ये जमा झाले नसल्याने दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाकडून मिळणारी देय रक्कम प्रलंबित राहिल्यामुळे दुकानदारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, सणासुदीच्या काळात त्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.त्यामुळे ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात स्वात धान्य बंद करण्याचा इशारा शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश रत्नपारखी यांनी दिला आहे.
स्वस्त धान्य वितरणाची जबाबदारी पार पाडताना दुकानदारांना विविध आर्थिक खर्चांचा भार सहन करावा लागतो. मात्र, सलग तीन महिन्यांचे मार्जिन मनी थकल्याने दैनंदिन व्यवहार आणि आर्थिक नियोजन कोलमडत असल्याची भावना दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. शासनाकडून देय असलेली रक्कम वेळेत मिळत नसेल, तर दुकानदारांनी आपला व्यवसाय कसा चालवायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश माधवराव रत्नपारखी यांनी पुणे जिल्ह्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. शिरूर शहर व तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांचे गेल्या तीन महिन्यांपासूनचे प्रलंबित मार्जिन मनी तातडीने त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावे, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली आहे.
‘मार्जिन मनी तातडीने जमा करा, अन्यथा धान्य वितरण बंद करण्याची वेळ येईल!’
प्रलंबित मार्जिन मनी त्वरित जमा न झाल्यास नाइलाजास्तव शिरूर शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे. त्यामुळे संबंधित पुरवठा विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. आता जिल्हा पुरवठा विभाग या मागणीची कितपत तातडीने दखल घेतो आणि दुकानदारांच्या खात्यांमध्ये प्रलंबित रक्कम कधी जमा होते, याकडे शिरूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे लक्ष लागले आहे.
— गणेश माधवराव रत्नपारखी
अध्यक्ष, शिरूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना, शिरूर, पुणे जिल्हा
– प्रा.सुभाष शेटे,९९७५६७४२८६
Home पुणे शिरूरमधील स्वस्त धान्य दुकानदारांचा संताप ! तीन महिन्यांचे मार्जिन मनी थकले; निधी न मिळाल्यास धान्य वितरण बंद करण्याचा इशारा सणासुदीच्या काळात दुकानदार आर्थिक अडचणीत; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी

शिरूरमधील स्वस्त धान्य दुकानदारांचा संताप ! तीन महिन्यांचे मार्जिन मनी थकले; निधी न मिळाल्यास धान्य वितरण बंद करण्याचा इशारा सणासुदीच्या काळात दुकानदार आर्थिक अडचणीत; जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेण्याची मागणी
BySamajsheel NewsOctober 14, 20260
