शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे यमाईच्या पोकळ दरा परिसरात भाऊसाहेब कचरू पोकळे यांच्या शेतात बांधलेल्या घोडीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घाटात धावणारी घोडी ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता बिबट्याने मागील ३ दिवसांपासून आपला मोर्चा कवठे येमाई गावठाणाकडे वळवला आहे.परवा रात्री रोड लगतच्या एका दुकानाजवळ एका कुत्र्यास बिबट्याने ठार केले असून काल दि. ०५ ला पहाटे पाचच्या दरम्यान गावठाणातील गुरांच्या दवाखान्याच्या नजीक वास्तव्यास असणारे नवनाथ येडे यांच्या घरामागे बांधलेल्या पाळीव इंग्लिश कुत्र्याचा बिबट्याने फडशा पाडला. दरम्यान काल रात्री ११ ते १२ च्या दरम्यान पीडीसीसी बँकेच्या मागे राहणारे पंकज सावंत यांना गोठ्यातील जनावरांची गडबड ऐकू आल्याने ते तात्काळ काठी घेऊन गोठ्याकडे गेले असता त्यांना मोठा बिबट्या पाहावयास मिळाला.त्यांनी काठीने मोठमोठे आवाज,आरडाओरडा केल्याने बिबट्या तिथून पळाला तर जवळील काळे आळीत दुसऱ्या मजल्यावर राहणारे निलेश राजगुरू यांनी साडे अकराच्या दरम्यान बॅटरीच्या उजेडात बिबट्या पाहिला. येथील मोहिचा आड परिसरातून मागील सलग तीन दिवस बिबट्या गावठाणात प्रवेश करीत असल्याची चर्चा असून ग्रामस्थ पुरते धास्तावले आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वी मारुती मंदिरानजीक ही बिबट्याने कुत्र्याला भक्ष करण्यासाठी मजल मारली होती. पण तो प्रयत्न यशस्वी झाला होता. शेत शिवार,रानात आपले भक्ष शोधणारा बिबट्या मागील तीन दिवसांपासून गावठाणांत येत असल्याने लाईटचा उजेड असून ही घराबाहेर पडणे नागरिकांच्या दृष्टीने धोकेदायक झाले आहे.कवठे गावठाणाच्या बऱ्याच बाजूने गवत, झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली असून बिबट्याला लपण्यासाठी झालेला हा आडोसा हटविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
प्रताप जगताप – वनपरिक्षेत्र अधिकारी,शिरूर
– कवठे गावठाणात बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांचा फडशा पाडल्याची माहिती मिळाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे बिबट्या जेरबंद व्हावा म्हणून तात्काळ पिंजरा लावण्याच्या सूचना कर्मचाऱयांना देत आहे. बिबट्या गावठाणात प्रवेश करीत असलेल्या अनुमानित ठिकाणी पिंजरा लावण्याच्या सूचना ही देत आहे. गावठाणात एक पेक्षा अधिक बिबटे येत असण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत असून नागरिकांनी रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये.
दरम्यान उद्या ६ रोजी दुपारपर्यंत गावठाणातील पंकज सावंत यांच्या गोठ्याजवळील बिबट्या गावठाणात येण्याच्या संभाव्य मार्गावर तात्काळ पिंजरा बसविला जाईल असे आश्वासन वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सा.समाजशील शी बोलताना दिले आहे.