शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा येथील गोकुळनगर परिसरात एका उसाच्या गुऱ्हाळा जवळील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने एका सहा वर्षीय बालकावर हल्ला केला केल्याची घटना घडली असून या घटनेत वंश सुरजकुमार सिंग वय सहा या बालकाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली असल्याची माहिती स्थानिक वनसेवक नवनाथ गांधले यांनी सा.समाजशील शी बोलताना दिली.
मांडवगण फराटा येथील घडलेल्या या दुर्दैवी घटनेत बिबट्याने लहान मुलाला ठार केल्याने एकच खळबळ उडाली असून शेतवस्तीवर वस्ती करून राहणाऱ्या नागरिकांनी जगायचे कसे? असा संतप्त सवाल युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजीराव शेलार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे यांनी केला आहे.घटनेची माहिती मिळताच वन विभाग अलर्ट झाला असून या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आठ पिंजरे परीसरात लावण्यात आले असून अजून चार पिंजरे तात्काळ या ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच या परीसरात पाच ट्रॅपिंग कॅमेरे ही तैनात करण्यात येत असून नागरिकांनी ही अधिकाधिक सुरक्षितता बाळगावी असे आवाहन शिरूरचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी केले आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते,सहायक वन संरक्षक भानुदास शिंदे व वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह बिबट रेस्क्यू टीम घटना स्थळी दाखल झाली त्यात युवा क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा सदस्य सुनील कळसकर,शरद गदादे,मनोज चौधरी,गोविंद शेलार हे शिरूर तालुका बिबट रिसक्यू टीम म्हणून कार्यरत होते.
दरम्यान आज सकाळीच आमदार अशोक पवार यांचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यात आमदार पवार यांचे पुतणे सचिन पवार ,सोमनाथ फराटे,अमोल ढवळे, संदीप शेलार,तन्वीर शेख व अनेक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेची माहिती पुणे जिल्हा पशुसवंर्धन समितीच्या माजी सभापती सुजाता पवार यांना दूरध्वनी वरून देण्यात आली. या पिडीत कुटुंबाबाला सर्वोतोपरी मदत करण्याची विनंती उपस्थित वन अधिकाऱ्यांना त्यांनी केली.परिसरात शेतकऱ्यांना बिबट्यांचे सध्या दिवसाढवळ्या देखील दर्शन होत आहे. या घटनेने गाव व परिसर प्रचंड दहशतीत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. शेतात शेतकऱ्यावर,शाळकरी विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला ,होण्याची वाट पाऊ नका बिबट्या हा नरभक्षी झाला आहे आणखी अनुचित घटना घडली काही कमी जास्त झालं तर याला संपूर्ण जबाबदार वन विभाग असेल असा इशाराही समस्त, ग्रामस्थ ,गोकुळनगर मांडवगण फराटा यांनी दिला आहे.
– संतोष कंक – प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी,शिरूर
शिरूरच्या मांडवगण फराटा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नक्कीच अत्यंत दुर्दैवी आहे.घटनेचा पंचनामा करण्यात आला असून शासन नियमाप्रमाणे लवकरात लवकर या पिडीत कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल.नागरिकांनी आपल्या पशुधनाचे आपले संरक्षण व्हावे या करता योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी.वन विभागाकडून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आठ पिंजरे, ५ ट्रॅप कॅमेरे या परिसरात बसविण्यात येत असून आणखी ४ पिंजरे बसविण्यात येत आहेत.