समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – शिरूर तालुक्यातील पत्रकारांच्या अनेक वर्षांचा पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन शिरूर हवेलीचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले.मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ व शिरुर येथील श्री गणेशा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार कटके यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे,मराठी पत्रकार संघांचे संस्थापक नितीन बारवकर,तालुकाध्यक्ष संजय बारहाते,युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत राष्ट्रीय किसान विकास मंच चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,जेष्ट पत्रकार प्रा.सुभाष अण्णा शेटे,रुग्णालयाचे संचालक डॉ.विशाल महाजन, डॉ अखिलेश राजुरकर,पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,रविंद्र काळे,आबासाहेब सरोदे,मराठी पत्रकार संघाचे समन्वयक पोपटराव पाचंगे,शहराध्यक्षा दिपाली काळे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनिल वडघुले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आमदार कटके म्हणाले की,पत्रकार हे समाजाचा आरसा असून सातत्याने समाजातील विविध समस्या मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतात. त्यावेळेस त्यांच्या आरोग्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष होते ,मात्र पत्रकार परिषदेने वर्धापन दिन हा आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचा केलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे.त्यामुळे अनेक आजाराचे प्राथमिक स्तरावर निदान होऊन उपचार करण्यास मदत होणार आहे.पत्रकारांचे प्रश्न राज्यस्तरावर मांडून ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळेस कटके यांनी दिले.
मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे म्हणाले की,आज परीषदेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यात ठिकठिकाणी दहा हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी एकाच वेळेस करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यभूमीत वढु येथुन करण्यात आली आहे .
यावेळी तालुका अध्यक्ष बारहाते म्हणाले की, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी केवळ पत्रकारिता न करता समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले असून कोविड काळात संघाने हजारो गोरगरीब रुग्णांना मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ सामाजिक बांधिलकी जपत तालुक्यात काम करत आहे.
यावेळी शिरुर तालुक्यातील ५० पत्रकारांची आरोग्य तपासणी डॉ.अखिलेश राजुरकर,डॉ.विशाल महाजन यांचे सहकारी डॉ.सागर केदारी ,युवराज उंडे, ज्ञानेश्वर कदम, गिरीजा आप्रे यांनी केली.उपस्थितांचे स्वागत समन्वयक पोपटराव पाचंगे यांनी तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष मदन काळे यांनी मानले.
शिरुरमध्ये पत्रकार भवन बांधण्यासाठी प्रयत्न करणार – आमदार ज्ञानेश्वर कटके
BySamajsheelDecember 9, 20240
133
Previous Post शिरूरच्या थिटे फार्मसी कॉलेज मार्फत एड्स विषयी जनजागृती
Next Postमुरबाड पोलिस वसाहतीच्या छता वरुन उडी मारून पोलिस हवालदाराची आत्महत्या - आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट