समाजशील न्यूज नेटवर्क, शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यात जवळपास एक हजार छोटे मोठे उद्योग सुरू आहेत. पण मुठभर लोकांनी या सगळ्या कंपन्यांमधील वेगवेगळ्या व्यवसायांवर कब्जा केला असुन नव्याने शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या तरुणांना मात्र कंपनीच्या गेटवर सुद्धा जाण्याची मुभा नाही. कंपनीच्या गेटवर गेले तर लगेच पोलीसांचा आधार घेऊन थेट खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाते.याच पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यात रोजगाराचा प्रश्न पुन्हा तापणार असून याप्रश्नी औद्योगिक क्षेत्र असलेल्या शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील तरुण सरसावले आहेत. तरुणांच्या या महत्वपूर्ण प्रश्नी क्रांतिवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष व भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांनी एल्गार केला असून पाचंगे हेच पुन्हा तरुणांचे आधारस्तंभ.होताना दिसून येत आहेत.
सणसवाडी गावात शेकडो कंपन्या, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक पण शिक्षण घेऊनही हाताला काम मिळत नाही, शेतजमिनी संपल्या जगायचे कसे ? ही समस्या अनेक बेरोजगार तरुणांपुढे उभी राहिली असुन नवतरुणांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या तरुणांनी कंपन्यांकडे रोजगार कसा मागायचा ही गंभीर समस्या असुन पोलीस कारवाई च्या भितीने शेकडो तरुणांचे आयुष्य उध्वस्त होण्याची भीती या तरुणांसमोर उभी राहिली असल्याचे संजय पाचंगे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
आम्ही कायदा पाळतो, नियम पाळतो, कंपन्याना संरक्षण देतो पण आम्हाला जगायला आधार द्या, कष्टाने कमवायला संधी द्या अशी विनवणी हे तरुण करताना दिसत आहेत.या समस्येवर उपाय काढण्यासाठी सणसवाडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन हा लढा लढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या विषयांवर कायदेशीर मार्गाने आंदोलने करून समाजातील वेगवेगळ्या घटकांना न्याय मिळवून देणाऱ्या क्रांतिवीर प्रतिष्ठान चे अध्यक्ष व भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांची निवड केली. पाचंगे यांनी या तरुणांच्या बरोबर बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीत गावात ज्या कंपन्या सुरू आहेत त्यांच्या सुरक्षितेला कुठलाही धक्का न लावता कंपन्यांना सहकार्य करत विश्वासात घेऊन त्याच बरोबर रोजगार नोंदणी कार्यालय व जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य घेऊन कायदेशीर मार्गाने हा लढा लढण्याचा निर्णय करण्यात आला.यासाठी गावातील गरजवंत बेरोजगार तरुणांची यादी बनवायला सुरुवात केली असुन जानेवारी २०२५ पासुन या लढ्याला सुरवात केली जाणार असल्याचे पाचंगे यांनी स्पष्ट केले आहे. हा लढा जर यशस्वी झाला तर तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी राज्यातील तरुणांना दिशा देणारा लढा ठरणार असुन याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यातील तरुणांचे लक्ष लागले आहे.