समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष अण्णा शेटे,कार्यकारी संपादक) – संपूर्ण पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूरच्या बेट भागातील टाकळी हाजी-कवठे गण,गटात कमळ फुलले असून मागील ५० वर्षांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य राहिलेला हा किल्ला ढासळल्याचे पहावयास मिळाले. या निवडणुकीत शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव,भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजेंद्र पोपटराव गावडे यांनी तब्बल ३३८५ मतांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला.याच गटातील टाकळी हाजी पंचायत समिती गणातून सुनीता बाळकृष्ण कड यांनी ११२३ मतांनी, तर कवठे येमाई पंचायत समिती गणातून कांचन राजेंद्र सांडभोर यांनी ११०२ मतांनी विजय मिळवल्याने भाजपने तिन्ही जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

ऐनवेळी तिकीट कापलं,पण मतदार मात्र गावडेंच्या पाठीशीच
निवडणुकीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदेशानुसार राजेंद्र गावडे यांनी प्रचार सुरू केला होता. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता.मात्र ऐनवेळी राजेंद्र गावडे यांचे तिकीट कापण्यात आले.त्यामुळे गावडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
गावडे साहेब हाच आमचा पक्ष-भाजप प्रवेशाचा निर्णय
प्रचार करायला सांगायचं आणि ऐनवेळी तिकीट कापायचं या भूमिके विरोधात गावडे समर्थक एकवटले. टाकळी हाजी, कवठे येमाई सह संपूर्ण गटात “पक्ष कोणताही असो,पोपटराव गावडे हेच हवेत ” अशी भूमिका स्पष्ट झाली. आणि समर्थकांच्या आग्रहाखातर राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा झाल्याच नाहीत तरी ही उमेदवार व कट्टर समर्थकांनी घराघरांत थेट मतदारांशी संपर्क साधत जोरदार प्रचार केला.या गटात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) व शिवसेना (उबाठा) अशी थेट चौरंगी लढत झाली. मात्र कोणतीही प्रचार सभा न होता देखील मतदारांनी स्पष्ट कौल देत भाजपच्या तिन्ही उमेदवारांना विजयी केले.
गेल्या ६ दशकांपासून शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांची निर्विवाद सत्ता या भागात राहिली आहे.यावेळीही पक्ष बदलला,चिन्ह बदलले पण मतदारांचा तोच विश्वास कायम राहिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.कवठे येमाई–टाकळी हाजी गटातील हा निकाल पुणे जिल्ह्याच्या राजकारणात नवा टर्निंग पॉइंट ठरला असून, राष्ट्रवादीला मोठा धक्का आणि भाजपसाठी ऐतिहासिक यश म्हणून पाहिला जात आहे.
गटातील उमेदवारांना मिळालेली मते
कवठे येमाई – टाकळी हाजी जिल्हा परिषद गट
राजेंद्र पोपटराव गावडे (भाजप) – १३,३५०
दामू घोडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९,९०९
डॉ. सुभाष पोकळे (शिवसेना) – ५,०८५
बाळासाहेब डांगे (शिवसेना उबाठा) – ४,६१९
नोटा – १७२
एकूण मते : ३३,७३५
टाकळी हाजी पंचायत समिती गण
सुनीता बाळकृष्ण कड (भाजप) – ७,४३३
संगिता दाभाडे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ६,३१०
प्रगती निचित (शिवसेना) – २,११०
पवित्रा शेलार (शिवसेना उबाठा) – ८७२
नोटा – १३१
एकूण मते : १६,८५६
कवठे येमाई पंचायत समिती गण
कांचन राजेंद्र सांडभोर (भाजप) – ६,१२६
माधुरी विलास थोरात (शिवसेना) – ५,०२४
शिल्पा थोरात (राष्ट्रवादी काँग्रेस) – २,३२५
जयश्री भाऊसाहेब लंघे (शिवसेना उबाठा) – ३,१६८
नोटा – २३७
एकूण मते : १६,८८०
“ही निवडणूक माझी वैयक्तिक नसून संपूर्ण तरुणाईने हातात घेतलेली लढाई होती. तरुणांनी पुढाकार घेतला, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आणि या विजयाचा पाया मजबूत केला. पक्षाने ऐनवेळी तिकीट नाकारल्यानंतर सर्व कार्यकर्ते, समर्थक आणि मायबाप जनतेच्या आग्रहाखातर मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. जनतेने तो निर्णय मोठ्या मनाने स्वीकारला, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरली.आज मिळालेला हा विजय मी माझे वडील, माजी आमदार पोपटराव गावडे यांना समर्पित करतो. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी या भागाची निस्वार्थ सेवा केली. त्यांच्या कार्यावर आणि संस्कारांवर विश्वास ठेवून जनतेने मला भरभरून पाठिंबा दिला, याबद्दल मी कायम ऋणी राहीन.निवडणूक काळात कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातील मायबाप जनता, बंधू-भगिनी, सहकारी, मित्रपरिवार आणि संपूर्ण गावडे कुटुंबीयांनी अतिशय जोमाने काम केले. अनेकांनी कष्ट उपसले, वेळ दिला, जीवाचे रान केले आणि मला विजयी करण्यासाठी अपार मेहनत घेतली. या उपकारांचे ऋण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही.
आजपासून मी पुन्हा एकदा अधिक जबाबदारीने गटातील प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होईन. कुणाचं दुःख असो किंवा आनंद, विकासाचा प्रश्न असो किंवा सामान्य माणसाची अडचण मी नेहमी तुमच्यासोबत उभा राहीन. एक जबाबदार लोकप्रतिनिधी आणि जनसेवक म्हणून अखंडपणे काम करत राहीन, हा ठाम विश्वास मतदारांना देत आहे.”
– राजेंद्र पोपटराव गावडे – नवनिर्वाचित जिल्हा परिषद,पुणे



