श्रीराम नवमी निमित्त कवठे येमाई येथे हरिकीर्तनाचा भक्तिमय सोहळा संपन्न 

71

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर,पुणे – (देवकीनंदन शेटे,संपादक) : श्रीराम नवमीच्या पावन पर्वा निमित्ताने श्री क्षेत्र कवठे येमाई येथे भक्तिमय वातावरणात हरिकीर्तनाचा सुंदर सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार  ह.भ.प. गायनाचार्य प्रा.अरुण महाराज उंबरेकर (झी टॉकीज फेम) यांनी श्रीराम जन्मावर आधारित प्रभावी हरिकीर्तन सादर केले. “राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईने” या अभंगावर निरूपण करताना महाराजांनी भगवंताच्या अवतार कार्याचे तसेच संतांच्या कार्याचे महत्त्व अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत उलगडून सांगितले. मानव जन्माचे उद्दिष्ट काय असावे, जीवन जगताना कोणत्या गोष्टींचे पालन करावे व कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.


भक्तीमार्गाचे महत्त्व अधोरेखित करताना नामस्मरण, पवित्र माळ धारण करणे, श्रीगुरूंचे मार्गदर्शन स्वीकारणे, तसेच जीवन निर्व्यसनी ठेवण्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. धर्माचे पालन, आई-वडिलांची सेवा आणि सदाचारपूर्ण जीवन हेच खऱ्या अर्थाने जीवन यशस्वी करणारे घटक असल्याचा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
तसेच “स्नेह, सेवा, संयम आणि सदाचार” या चतुःसूत्रीचा अंगीकार केल्यास परमार्थ साध्य होतो, असे सांगताना “परमार्थात आवड असावी व संसारात सवड असावी; सवडीचा संसार टिकत नाही आणि आवडीचा परमार्थ सुटत नाही” हे प्रगल्भ विचार त्यांनी आपल्या चिंतनातून मांडले.
यंदाचे हे हरिकीर्तनाचे २७वे वर्ष असून, प्रा. उंबरेकर महाराजांनी सलग २६ वर्षे अखंड सेवा केल्याबद्दल कवठे येमाई ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास गावातील नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनानंतर पाळणा, आरती व समारोप करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *