NEWS
Search

मेजर यशवंत बारगजे यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात संपन्न ; बारगजवाडीत जल्लोषात गौरव

119

समाजशील न्यूज नेटवर्क,शिरूर कासार /बारगजवाडी,(प्रा.देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – गेल्या २५ वर्षांपासून भारतीय सीमा सुरक्षा दलात निष्ठेने व कार्यक्षमतेने सेवा बजावलेल्या मेजर यशवंत बारगजे यांचा सेवापूर्ती समारंभ बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात पार पडला. त्यांच्या देशसेवेच्या कार्याचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
बारगजवाडीतील पहिले सैनिक म्हणून मान मिळवलेल्या मेजर बारगजे यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नेत्रदीपक लेझीम नृत्याने वातावरण भारावून गेले. या समारंभाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा, आरोग्य तसेच सैन्य क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे प्रा.संतोष बारगजे यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विकास आघाव यांनी करताना ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातून पुढे आलेल्या मेजर बारगजे यांच्या शिक्षणातील संघर्षमय प्रवासापासून ते २५ वर्षांच्या यशस्वी देशसेवेपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. तसेच गावातील पोलीस, सैन्य, वनरक्षक, शिक्षक आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत तरुणांचेही त्यांनी कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आघाव यांनी केले. महंत यादव महाराज व ह.भ.प. छगन महाराज यांचे आशीर्वाद लाभले. परिसरातील राजकीय नेते, माजी सैनिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही मेजर बारगजे यांना शुभेच्छा दिल्या.
मेजर यशवंत बारगजे यांनी आपल्या मनोगतात सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले. समारंभाचा समारोप स्वादिष्ट भोजन आणि प्रा. डी. के. सर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.देशसेवेचा अभिमान बाळगणाऱ्या या कर्तृत्ववान सैनिकाचा सन्मान करताना बारगजवाडी ग्रामस्थांनी एकात्मतेचा आणि देशभक्तीचा अनोखा संदेश दिला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *